रायगड जिल्ह्य़ातील २५६ गावे आणि ५९५ वाडय़ांना भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांना सध्या ३१ टँकरनी पाणीपुरवठा केला जातो आहे. पेण, माणगाव, पोलादपूर, कर्जत आणि अलिबाग तालुक्यांना पाणीटंचाईची सर्वाधिक झळ बसली आहे. राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत कोकणात पाऊस चांगला झाल्याने या वर्षी पाण्याचे दुर्भिक्ष फारसे जाणवले नव्हते, मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासून पाण्याचे स्रोत आटल्याने आता कोकणातील काही भागांत पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्य़ातील २५६ गावांना सध्या भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ इथल्या ग्रामस्थांवर आली आहे.
जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेतला, तर अलिबाग तालुक्यातील ३० गावे आणि २० वाडय़ा, पनवेलमधील ३ गाव आणि ४ वाडय़ा, कर्जत तालुक्यातील २३ गावे, ६८ वाडय़ा, खालापूरमधील ८ गावे, ६८ वाडय़ा, पेण तालुक्यातील २७ गावे आणि ७५ वाडय़ा, सुधागड पालीमधील ८ गावे, १९ वाडय़ा, रोहा तालुक्यातील २९ गावे आणि ३३ वाडय़ा, माणगाव तालुक्यातील ३३ गावे आणि ६८ वाडय़ा, महाड तालुक्यातील ८ गावे आणि ६७ वाडय़ा, पोलादपूरमधील ४२ गावे आणि १५५ वाडय़ा, म्हसळ्यातील ४ गाव आणि ६ वाडय़ा, श्रीवर्धनमधील १० गावे, ४८ वाडय़ा, मुरुडमधील २२ गावे आणि १० वाडय़ा, तळामधील ९ गावे, २९ वाडय़ा, तर उरणमधील १ वाडीला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे.
या सर्व गावांना सध्या ३१ टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा केला जातो आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या होत्या. या योजनांसाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले होते. जिल्हा टँकरमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला होता. मात्र ग्रामपंचायतस्तरावर लाखो रुपये खर्चून राबविण्यात येणाऱ्या योजना कुचकामी ठरत असल्याचे या टंचाईमुळे दिसून आले.
पेण तालुक्यातील खारेपाट विभागाला तर दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. पेण तालुक्याला पाणीपुरवठा करणारे शहापाडा धरणही आता कोरड पडत आले आहे, तर दुसरीकडे हेटवणे धरणात काही टीएमसी पाणीसाठा वापराविना पडून आहे. त्यामुळे धरणात आहे पण पिण्याला थेंबभर पाणी नाही, अशी परिस्थिती पेणकरांची झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th May 2013 रोजी प्रकाशित
रायगड जिल्ह्य़ात २५६ गावे, ५९५ वाडय़ांमध्ये पाणीटंचाई
रायगड जिल्ह्य़ातील २५६ गावे आणि ५९५ वाडय़ांना भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांना सध्या ३१ टँकरनी पाणीपुरवठा केला जातो आहे. पेण, माणगाव, पोलादपूर, कर्जत आणि अलिबाग तालुक्यांना पाणीटंचाईची सर्वाधिक झळ बसली आहे. राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत कोकणात पाऊस चांगला झाल्याने या वर्षी पाण्याचे दुर्भिक्ष फारसे जाणवले नव्हते,
First published on: 24-05-2013 at 03:42 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 256 villages and 595 block suffering huge water shortage in raigad district