गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत पुन्हा एकदा हिंसाचार, जाळपोळ व स्फोटांचा उद्रेक सुरू केला असून लेखा-गोडलवाही मार्गावर पुण्यातील एका खासगी बांधकाम कंपनीचे ट्रॅक्टर, जेसीबी, रोड रोलर, मोटरसायकल व पाण्याचे टँकर अशी २७ वाहने एकाच वेळी जाळल्याने खळबळ उडाली आहे. नक्षलवाद्यांनी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वाहने जाळण्याची ही पहिलीच घटना आहे.
गडचिरोली जिल्हय़ात पोलीस, सी-६० व केंद्रीय राखीव पोलीस दलाचा दबाव वाढत असतानाच नक्षलवाद्यांनी हिंसाचाराला सुरुवात केली आहे. सध्या गडचिरोलीत मोठय़ा प्रमाणात रस्त्यांची तसेच शासकीय इमारतींची कामे सुरू आहेत. धानोरा तालुक्यातील धानोरा-पेंढरी या रस्त्याचे काम पुण्यातील एका नामांकित कंपनीला मिळाले आहे. या कंपनीने नुकतेच रस्त्याचे काम सुरू केले असून त्याकरिता स्थानिकांचे २० ट्रॅक्टर, दोन जेसीबी मशीन, एक रोड रोलर, दोन पिण्याच्या पाण्याचे टँकर, दोन मोटरसायकल व इतर साहित्य भाडय़ाने घेतलेले आहे. नक्षलवाद्यांच्याा भीतीने काम तातडीने पूर्ण करायचे असल्याने दिवस-रात्र काम सुरू असल्याची खबर नक्षलवाद्यांना लागली. त्यामुळे रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास सुमारे ५० ते ६० नक्षलवादी घटनास्थळी दाखल झाले. या वेळी त्यांनी कामावर असलेल्या सर्व कामगारांना बंदुकीचा धाक दाखवून परत पाठवून दिले. यानंतर सर्व वाहनांवर रॉकेल टाकून आग लावून दिली. संपूर्ण वाहने जळेपर्यंत नक्षलवादी घटनास्थळीच उभे होते. वाहने जळल्यानंतर नक्षलवादी जंगलात निघून गेले. या घटनेची तक्रार कंपनीच्या व्यवस्थापकाने धानोरा व गडचिरोली पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर जवळपास दोन तासांनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत वाहने जळून खाक झालेली होती. विशेष म्हणजे ही सर्व वाहने स्थानिकांची असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नक्षलवाद्यांनीही पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वाहनांची जाळपोळ केली. गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठीच नक्षलवाद्यांनी ही वाहने जाळली. हे लक्षण अतिशय भेकाडपणाचे असून विकासाला खीळ घालणारे आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असले तरी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात करीत नक्षल शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jan 2013 रोजी प्रकाशित
गडचिरोली जिल्ह्यत नक्षलवाद्यांनी २७ वाहने जाळली
गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत पुन्हा एकदा हिंसाचार, जाळपोळ व स्फोटांचा उद्रेक सुरू केला असून लेखा-गोडलवाही मार्गावर पुण्यातील एका खासगी बांधकाम कंपनीचे ट्रॅक्टर, जेसीबी, रोड रोलर,
First published on: 14-01-2013 at 03:09 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 27 vehicles brunted by naxalities in gadcharoli district