‘केबीसी’ घोटाळ्यावरून संपूर्ण राज्यात गहजब उडाला असला तरी सहा महिन्यांपूर्वी नाशिक शहर पोलिसांनी स्वत: पुढाकार घेत संचालकांवर गुन्हा दाखल करून या कंपनीचे बँकेतील २४ कोटी रुपये गोठविले होते तसेच केबीेसीच्या कार्यालयातून साडे चार कोटीची रोकड जप्त केली होती. या प्रकरणी नव्याने गुन्हा दाखल झाल्यानंतर तक्रारींचा ओघ सुरू झाला असून, फसवणुकीची रक्कम कोटय़वधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात तीन संशयितांना न्यायालयाने २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तीन वर्षांत तिप्पट रक्कम देण्याचे अमिष दाखवून कंपनीने राज्यातील हजारो नागरिकांना गंडविल्याचे उघड होत आहे. एकटय़ा नाशिकमध्ये आतापर्यंत १२७ गुंतवणुकदारांनी केलेल्या तक्रारींमध्ये फसवणुकीची रक्कम तब्बल आठ कोटी रुपये आहे. या कंपनीत गुंतविलेली रक्कम परत मिळण्याची आशा संपुष्टात आल्याने निराश झालेल्या नाशिक येथील माय-लेकांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरून या प्रकरणातील मुख्य संशयिताविरुध्द स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.
केबीसी कंपनीच्या संशयास्पद कार्यशैलीची कुणकुण सहा महिन्यांपूर्वी नाशिक पोलिसांना लागली होती. त्यावेळी पोलीस आयुक्तालयाने आवाहन करून या कंपनीविरुद्ध तक्रार करण्यास पुढे येण्याचे आवाहन केले होते. परंतु, त्यावेळी एकही तक्रारदार पुढे आला नाही. अखेर पोलिसांनी स्वत: गुन्हा दाखल करून कंपनीच्या संचालकांना अटक केली होती. कंपनीच्या सुमारे २९ कोटी रूपयांवर पोलिसांचे नियंत्रण असल्याचे पोलीस उपायुक्त (गुन्हे) पंकज डहाणे यांनी सांगितले. जामिनावर सुटलेला केबीसीचा संचालक भाऊसाहेब व त्याची पत्नी आरती चव्हाण हे परदेशात परागंदा झाल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणी एका गुंतवणूकदाराने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी केबीसी क्लब अॅण्ड रिसॉर्ट प्रा. लिमिटेडचा संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण व त्याची पत्नी आरती, बापूसाहेब चव्हाण या संचालकांसह दलाल व कर्मचाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल केला. तेव्हापासून आतापर्यंत १२७ गुंतवणूकदारांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार दिल्याची माहिती आडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनील पवार यांनी दिली. केबीसी प्रकरणात मुख्य संशयिताचा शालक पोलीस कर्मचारी संजय वामन जगताप, संशयिताचा भाऊ नानासाहेब चव्हाण व साधना चव्हाण यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या तिघांची २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.