जिल्ह्य़ात खळबळ, मच्छीमारांमध्ये भीती
काडतुसे शस्त्रागार विभागाकडे पाठविणार -जि. पो. अधी. पांडे
श्रीक्षेत्र गणपतीपुळे किनाऱ्यापासून सुमारे ११ लाल (फॅदम) खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या एका मच्छीमाराच्या जाळ्यात विदेशी बनावटीची ३२९ जिवंत काडतुसे सापडली असून, त्यामध्ये एसएलआरची ९० तर २३९ लहान राऊण्ड आहेत. यामुळे जिल्ह्य़ात खळबळ उडाली असून, मच्छीमारांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, ही काडतुसे मच्छीमारांनी पोलिसांच्या ताब्यात दिली असून, त्याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. येथून जवळच असलेल्या साखरतर-गणपतीपुळे सागरी महामार्गावरील कासारवेली, खारपीवाडी येथील सुनील पोमेंडकर (४८) हे आपली माऊली गगनगिरी ही लाँच घेऊन गणपतीपुळेच्या समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. मासेमारी केल्यानंतर ते गुरुवारी परत आले. जाळ्यात अडकलेले मासे काढत असताना त्यांना जाळ्यामध्ये एक पार्सल सापडले. त्यांनी ते कुतूहलापोटी उघडले असता त्यामध्ये स्वयंचलित रायफलीची ३२९ काडतुसे असल्याचे आढळून येताच क्षणभर तेही गांगरून गेले. मात्र प्रसंगावधान राखून त्यांनी तात्काळ रत्नागिरी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली, तसेच गावचे पोलीस पाटील कृष्णाकुमार केळकर व सागर सुरक्षा दलाचे विजय बोरकर, सुभाष लाकडे यांनाही माहिती दिली. पोलिसांनी ही काडतुसे ताब्यात घेतली आहेत.
काडतुसे शस्त्रागार विभागाकडे
दरम्यान, श्रीक्षेत्र गणपतीपुळे समुद्रात सापडलेली जिवंत काडतुसे ही बाब अत्यंत गंभीर असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे, तसेच ही काडतुसे नाशिक येथील दारूगोळा शस्त्रागार विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीपक पांडे यांनी दिली. अशा प्रकारच्या काडतुसांचा वापर कशासाठी केला जातो, याबाबतचा तपशील संबंधित शस्त्रागार विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.