पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कार्ला फाटय़ाजवळ भरधाव मोटार रस्त्यालगतच्या भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात नवी मुंबई येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. या अपघातामध्ये पाच वर्षांची चिमुकली बचावली आहे. हे सर्व जण एकवीरा देवीचे दर्शन घेऊन मुंबईकडे परतत असताना  हा अपघात झाला.
जनार्दन वांगा वास्कर (६५), लीलाबाई जनार्दन वास्कर (६०), रवींद्र जनार्दन वास्कर (३५), रूपेश जनार्दन वास्कर (२८) आणि सुवर्णा वास्कर (रा. खारघर, नवी मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. वास्कर कुटुंबीय सकाळी एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते मुंबईच्या दिशेने निघाले होते. कार्ला फाटय़ाजवळ स्विफ्ट चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या एका धाब्याच्या भिंतीवर जाऊन धडकली. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. सुवर्णा यांना जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामध्ये सुवर्णा यांची पाच वर्षांची चिमुकली आचल ही बचावली आहे.