हॉटेलमध्ये जेवायला गेलात तर तुमच्या बिलावर इतके दिवस १८ टक्के जीएसटी लागत होता. मात्र आता या जीएसटीत कपात करण्यात आली आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली. कोणत्याही हॉटेल चालकाने ५ टक्क्यांपेक्षा जास्त जीएसटी आकारल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.

याआधी वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ९ ते २८ टक्के या प्रमाणात जीएसटी घेतला जात होता. ज्यामुळे हॉटेलिंग करणारे ग्राहक चांगलेच वैतागले होते. हॉटेल बिलावर टीका होत होती तसेच याबाबत खिल्ली उडवणारे जोकही सोशल मीडियावर व्हायरल होत होते. अशा सगळ्या वातावरणात काही दिवसांपूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सगळ्या हॉटेल्सना ५ टक्के जीएसटी लागणार असल्याचे संकेत दिले होते. बुधवारपासून राज्यात याची अंमलबजावणी होणार आहे.

हॉटेलमध्ये १८ टक्क्यांवरुन ५ टक्के जीएसटीची अंमलबजावणी बुधवारपासून होणार आहे. हॉटेल मालक किंवा विक्रेते व्हॅट कमी न करता जीएसटी लावत होते त्यामुळे ग्राहकांची लूट सुरु होती. मात्र उद्यापासून (बुधवार) दरपत्रकात हॉटेल मालकांनी बदल करणे आवश्यक आहे. जे हॉटेल मालक दर कमी करणार नाहीत त्यांच्याविरोधात कारवाई करणार असल्याचेही बापट यांनी स्पष्ट केले.

ग्राहकांनी १८००२२५९०० या हेल्पलाईनवर तक्रार करण्यासही हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले. वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीची अंमलबजावणी १ जुलैपासून देशात करण्यात आली. यामध्ये हॉटेलिंगवर १८ टक्के जीएसटी लावण्यात आल्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणावर नाराज झाले होते. आता हा जीएसटी १८ वरुन ५ टक्क्यांवर आणला गेल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.