बंदीगृहात देवकी व वसुदेवाचा होणारा छळ..घागर फोडणारा श्रीकृष्ण..द्रौपदीच्या मदतीसाठी धावलेला श्रीकृष्ण..कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण.. रंगमंचावर साकारणारे श्रीकृष्णाचे एकेक रूप आणि या अभूतपूर्व नाटय़ाचे साक्षीदार झालेला सुमारे दहा हजारांचा जनसमुदाय. एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वितेची पावती यापेक्षा अधिक कोणत्या स्वरूपात मिळू शकेल?
सिन्नर तालुक्यातील वडांगळी हे गाव अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. या गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आणि न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने पाच वर्षांपासून वार्षिकोत्सवात महानाटय़ाचे आयोजन करण्यात येते. यंदा त्यासाठी ‘कृष्णावतार’ या महानाटय़ाची निवड करण्यात आली. राजेंद्र भावसार, गणेश लोकमाने, डी. ए. वैष्णव, व्ही. आर. जाधव यांची संकल्पना तर ठरली. त्यांच्या पाठीशी शरद रत्नाकर व रामनाथ आरोटे हे दोन्ही मुख्याध्यापक उभे राहिले. परंतु हे महानाटय़ आणि तेही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन वास्तवात उतरविणे किती कठीण, याची जाणीवही त्यांना झाली. परंतु तरीही हिंमत न हारता या महानाटय़ातील विविध भूमिकांसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याचे काम सुरू झाले. देवकीपासून तर श्रीकृष्णापर्यंत सर्वच लहानमोठय़ा व्यक्तिरेखा रेखाटण्यासाठी दोन्ही शाळांमधील सुमारे ३५० विद्यार्थ्यांचे पथक अंतिमत: तयार झाले. त्यानंतर सुरू झाला दिवसभर दोन दोन तास तालमींचा रतीब. न कंटाळता महिनाभर विद्यार्थी या महानाटय़ाचा सराव करत होते. कष्टपूर्वक केलेल्या सरावाला जनतेकडून कसा प्रतिसाद मिळेल, याची धाकधूक विद्यार्थ्यांसह या महानाटय़ाशी संबंधित सर्वानाच होती.
शुक्रवारचा दिवस उजाडला. वडांगळीत श्रीकृष्णावतार या महानाटय़ाचा प्रयोग विद्यार्थी सादर करणार असल्याची चर्चा एव्हाना पंचक्रोशीत सर्वत्र पसरली होती. शिवाय हा प्रयोग रात्री नव्हे तर, सकाळचा असल्याने सर्वासाठी वेळ श्रेयस्कर ठरली. बघता बघता गर्दीने दहा हजारांचा आकडा ओलांडला. कृष्णाजी भगत, उदय सांगळे, गटविकास अधिकारी संदीप कोहिनकर, राजाभाऊ वाजे आदींच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी नऊ वाजता महानाटय़ास सुरुवात झाली. कंसाला मृत्यूची मिळणारी कल्पना..देवकी व वसुदेव यांचा बंदीवास..देवकीच्या सात मुलांची कंसाने केलेली हत्या..अशी एकापाठोपाठ एक दृश्ये रंगमंचावर साकारू लागतात. तल्लीन होऊन उपस्थित जनसमुदाय एकेक दृश्ये डोळ्यात साठवू लागला. टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद देऊ लागला. या प्रतिसादामुळे कलाकारांचा उत्साह अधिकच दुणावला. अभिनयाची धार अधिकच तीव्र झाली. महानाटय़ात गुंग झालेल्या रसिकांना प्रयोग कधी संपला ते कळलेच नाही. तोपर्यंत दुपारचे पाऊण वाजले होते.
सुमारे दीड लाख रुपयांचा खर्च आलेल्या या महानाटय़ास उपस्थितांकडून भरीव आर्थिक मदत मिळाली. मदतीचा हा आकडाच ८४ हजार रुपयांपर्यंत पोहोचला. सुमारे साडेचार तास हे महानाटय़ रंगले. गर्दी आपापल्या गावी परतू लागली होती. सर्वाच्या तोंडी महानाटय़ाचीच चर्चा. त्यांना उत्सुकता आहे पुढील वर्षी कोणते महानाटय़ पाहावयास मिळणार याची.