यंदा अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत एकूण ६३ तास २५ मिनिटे कामकाज झाले. मंत्रीच उपलब्ध नसल्याने कामाची ५५ मिनिटे वाया गेली. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सत्तारूढ बाकावरील उपस्थिती यथातथाच होती.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १० डिसेंबरला नागपुरात सुरू झाले. आज सायंकाळी अधिवेशन संस्थगित झाले. पुढील अधिवेशन मुंबईत सोमवार ११ मार्च २०१३ रोजी होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या आठवडय़ात एसआयटीच्या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधान परिषदेत गदारोळ केला.प्रश्नोत्तर, लक्षवेधी सूचना व इतर कामकाजात ते सहभागी झाले होते. दुसऱ्या आठवडय़ात खऱ्या अर्थाने कामकाज सुरळीत झाले. १० ते २१ डिसेंबरदरम्यान विधान परिषदेत एकूण ६३ तास २५ मिनिटे कामकाज झाले. रोज सरासरी ६ तास १२ मिनिटे कामकाज झाले. चर्चेदरम्यान मंत्रीच उपलब्ध नसल्याने एकूण ५५ मिनिटे, गणपूर्ती अभावी १० मिनिटे तर इतर कारणांनी १४ तास वाया गेले. ३ हजार३०० तारांकित प्रश्न झाले. २ हजार ६९२ प्रश्नांपैकी १ हजार ११८ प्रश्न स्वीकृत करण्यात आले.
 एकूण ८२ तोंडी प्रश्नोत्तरे झाली. कालच्या तुलनेत शुक्रवारी अखेरच्या दिवशी विधान परिषदेत सत्तारूढ बाकावरील सदस्यांची उपस्थिती यथातथाच होती. दुपारनंतर ती रोडावली. काहींचा अपवाद वगळता अनेक आमदार तसेच मंत्री शुक्रवारी रात्री विमान, रेल्वे तसेच बस वा खाजगी वाहनांनी आपापल्या गावी रवाना झाले.