सोलापूर : उन्हाळी सुट्टीनिमित्त हैदराबादहून सोलापुरात मामाच्या घरी आलेल्या एका आठ वर्षाच्या मुलाचा जड वाहतुकीने बळी घेतल्याची घटना नई जिंदगी परिसरात घडली. असद गौस शेख असे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. तो हैदराबाद येथे आई-वडिलांसह राहात होता. त्याचे आजोळ सोलापुरात होते. उन्हाळी सुट्टीनिमित्त तो काही दिवसांपूर्वी नई जिंदगी परिसरात नागनाथ नगरात मामाच्या घरी आला होता.

हेही वाचा >>> वृद्ध बहिणीच्या नावाने बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज उचलले ७५ लाखांचे कर्ज

दरम्यान, मंगळवारी सकाळी मामाच्या दुचाकीवर पाठीमागे बसून असद हा कुंभारी येथील गोदूताई परूळेकर महिला विडी घरकूल परिसरात पाहुण्याकडे निघाला होता. फरंतु वाटेत प्रचंड धूळ उडवत येणा-या एका हायवा मालमोटारीचा धकोका बसला आणि मामा-भाचा दोघे दुचाकीवरून खाली कोसळले. त्यात छोटा असद हा हायवा गाडीच्या पाठीमागील चाकाखाली चेंगरला गेला. छत्रपती शिवाजी महाराज सर्वौपचार रूग्णालयात दाखल केले असता त्यास मृत घोषित करण्यात आले. सोलापूर शहरात जड वाहतुकीचे बळी जात असल्यामुळे पोलीस प्रशासनाने शहरात दिवसा जड वाहतुकीवर बंदी घातली होती. केवळ अत्यावश्यक सेवेशी संबंधित जड वाहतुकीला परवानगी आहे. या परवानगी असलेल्या जड वाहतुकीला सुध्दा निश्चित केलेल्या रस्त्यावरून वाहतूक करण्याची अट आहे. परंतु नियमांचे उल्लंघन करून शहरात जड वाहतूक राजरोसपणे सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.