scorecardresearch

राज्यात नगरपंचायतींसाठी सरासरी ८१ टक्के मतदान; बुधवारी होणार मतमोजणी

राज्य निवडणूक आयोगाने एकूण १०६ नगरपंचातींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या.

81 percent voting for Nagar Panchayats in the state

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील ९३ नगरपंचायतींमधील ३३६ जागांसाठी आज सरासरी ८१ तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या २३ आणि त्यांतर्गतच्या पंचायत समितीच्या ४५ जागांसाठी ७३ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अदाज आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील १०६ नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार विविध महानगरपालिकांतील चार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार होते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या १५ डिसेंबर २०२१ च्या आदेशानुसार या कार्यक्रमात अंशत: बदल करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आज मतदान झाले. अन्य सर्व जागांसाठी मात्र पूर्वनियोजितपणे २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान पार पडले होते.

राज्य निवडणूक आयोगाने एकूण १०६ नगरपंचातींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्यातील तलासरी, विक्रमगड, मोखाडा, पेठ, सुरगाणा, धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ, झरी- जामणी, मुलचेरा, एटापल्ली, कोरची, भामरागड या ११ नगरपंचायतींमध्ये एकही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव नव्हती. त्यामुळे तेथे सर्व जागांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान पार पडले. उरलेल्या ९५ नगरपंचायतीतील अनारक्षित झालेल्या ३४४ जागांसाठी १८ जानेवारी २०२२ रोजी मतदान होणार होते. त्यापैकी शिर्डीतील चार आणि आणि कळवणमधील दोन जागा बिनविरोध झाल्याने तेथे मतदानाची आवश्यकता राहिली नाही. त्याचबरोबर माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे आता ९३ नगरपंचायतीतील ३३६ जागांसाठी आज मतदान झाले.

भंडारा जिल्हा परिषदेच्या १३ आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या १०; तसेच या दोन्ही जिल्ह्यातील पंचायत समित्यांतील ४५ जागांसाठीदेखील आज प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ७३ टक्के मतदान झाले. त्याचबरोबर विविध जिल्ह्यांतील १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ७६ टक्के मतदान झाले. सांगली- मिरज- कुपवाड महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठीसुद्धा प्राथमिक अंदाजानुसार ५० टक्के मतदान झाले. या सर्व ठिकाणी बुधवारी सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरूवात होईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 81 percent voting for nagar panchayats in the state counting will take place on wednesday abn

ताज्या बातम्या