कर्करोगाच्या विकारातील तोंडाचा कर्करोग हा देशातील गंभीर विकार बनला असून याला बळी पडणा-या रुग्णांच्या संख्येत प्रतिवर्षी झपाटय़ाने वाढ होत चालली आहे. जगभरातील ८६ टक्के तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण भारतात आढळत आहेत. यामुळेच तोंडाच्या कर्करोगाची राजधानी म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. तंबाखूमुळे होणा-या कॅन्सरचे प्रमाण देशभरात ४१ टक्के इतके प्रचंड असल्याने सावधानतेचा इशारा आरोग्य विभाग व कर्करोग तज्ञांनी दिला आहे.
तंबाखू व तंबाखूपासून बनविले जाणारे मादक पदार्थ सेवन करण्याची क्रेझ तरुण पिढीमध्ये वाढत आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास कायद्याने मनाई केली असली तरी सिगारेट, विडी भररस्त्यावर फुंकणा-यांची संख्या वाढतच चालली आहे. धूम्रपान करणा-यात व तंबाखूचे सेवन करणा-यात पुरुष वर्ग जसा पुढे आहे तद्वत स्त्रियांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढत आहे. तपकीर, मशेरी, तंबाखू खाणे याचे प्रमाण महिलांमध्ये वाढले असल्याचे पाहणीत दिसून आले आहे. यामुळे भारतात तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यामुळे कर्करोग होणा-या रुग्णांच्या संख्येत दरवर्षी सुमारे ८० हजार रुग्ण आढळून येत असून २०२० सालापर्यंत हे प्रमाण भयावह प्रमाणात वाढले जाईल असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
कर्करोग विशेषत तंबाखूपासून होणा-या कर्करोगाच्या रुग्णांची आकडेवारी पाहिल्यास त्यातील भीषणता लक्षात यावी. देशात दरवर्षी ८ लाख नवीन कर्करुग्णांचे निदान होते. त्यामध्ये अडीच लाख कर्करोगाचे रुग्ण आढळतात. पकी ८० हजार रुग्ण तंबाखूमुळे तोंडाचा कर्करोग झालेले असतात. तंबाखूमुळे कर्करोग होण्याचे देशभरातील प्रमाण ४१ टक्के आहे, तर कोल्हापूरसारख्या भागात ६५ ते ६८  टक्के रुग्ण तोंडाच्या कर्करोगाचे असल्याचा धक्कादायक निष्कर्ष कोल्हापूर कॅन्सर रजिस्ट्रीने नोंदविला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांचा अभ्यास केल्यास तंबाखू सेवन, धूम्रपानाचे वाढते प्रमाण विचारात घेता गंभीर स्थिती उद्भवू शकेल, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. विशेष म्हणजे ६० टक्के कर्करोगाचे रुग्ण हे २५ ते ५० वयोगटातील आहेत.
तंबाखू व धूम्रपान वेगवेगळ्या माध्यमातून सेवन केल्यामुळे तरुणाईत कर्करोग जोमाने फोफावत आहे. परिणामी तरुणांचा कर्करोग हा एक अफाट सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे, असे नमूद करून कोल्हापूर कर्करोग केंद्राचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक डॉ. सुरज पवार यांनी तंबाखूमुळे शरीरात तब्बल १४ अवयवांचा कर्करोग होत असल्याचे म्हटले आहे. तंबाखूमुळे फुफ्फुस, जठर, किडनी, मूत्राशय आणि गर्भाशय, तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. दरवर्षी दीड लाख कर्करोग, ४२ लाख हृदय रोग व ३७ लाख फुफ्फुसांचे आजार तंबाखूमुळे उद्भवतात. कर्करोग आढळून आल्यास घाबरून न जाता योग्य तपासणी व उपचार केल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो असे मत डॉ. पवार यांनी व्यक्त केले.