माजी नगरसेवकपुत्रावर गुन्हा दाखल
बुलेटवर दोन्ही हात सोडून, हातात पिस्तूल घेऊन समोरील बाजूला रोखून स्टंटबाजी करणे सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाच्या पुत्राला अंगलट आले. याप्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेऊन त्याच्यासह दोघाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.चेतन नागेश गायकवाड (रा. सेटलमेंट फ्री काॕलनी, सोलापूर) व त्याचा साथीदार राजू भंडारी अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. चेतन हा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचा मुलगा आहे. पोलीस खात्यातील अभिलेखात झालेल्या नोंदीनुसार चेतन गायकवाड याच्या नावावर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी आदी अनेक गंभीर गुन्हे आहेत. रामवाडी, सेटलमेंट, सात रस्ता, मोदी, रेल्वे स्थानक आदी भागात त्याची दहशत आहे.
चेतन गायकवाड याने बुलेटवर दोन्ही हात हात सोडून, हातात पिस्तूल घेऊन समोरच्या बाजूला रोखून स्टंटबाजी करताची चित्रफित समाज माध्यमातून प्रसारीत झाली. राजू भंडारी याने जनतेमध्ये दहशत निर्माण होण्याच्या उद्देशाने ही चित्रफित प्रसारीत केल्याचे दिसून आले. याप्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात हवालदार सतीश शिंदे यांच्या फिर्यादीनुसार चेतन गायकवाड व राजू भंडारी या दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. चेतन यास लगेचच अटक झाली नसून त्याने स्टंटबाजी करताना वापरलेले पिस्तूलही जप्त झाले नाही.
काही दिवसांपूर्वी सोलापुरात हिंदू गर्जना मोर्चा निघाला असता त्यात सहभागी झालेले राष्ट्रवादीचे माजी महापौर महेश कोठे यांचे पुत्र, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे ही हातात तलवार घेऊन हवेत फिरवत असताना आढळून आले होते. त्यांच्या विरूध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. परंतु गुन्हा नोंद होऊनही प्रथमेश कोठे यांच्याकडून पोलिसांनी वेळीच तलवार हस्तगत केली नव्हती. नंतर मात्र ही तलवार खरी नाही तर लाकडी होती, असा निष्कर्ष समोर आला. त्यानंतर आता चेतन गायकवाड याने स्टंटबाजी करताना वापरलेले पिस्तूल वेळीच जप्त केले तरच त्याबाबत सत्यता पडताळता येणार नाही. यात विलंब झाल्यास पुन्हा हे पिस्तूल खरे असल्याचा निष्कर्ष काढणे पोलिसांना कठीण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.