सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं. दरम्यान चिपी विमानतळवर मुंबई येथून आलेलं एका विमानाच्या लँडिगदरम्यान अजब प्रकार घडला. यामुळे मुंबईहून आलेलं प्रवासी विमान अवकाशातच दहा मिनिटं घिरट्या घालत होतं. धावपट्टीवर चक्क कोल्हा आल्याने विमानाचं लँडिंग दहा मिनिटे थांबलं होतं.

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं ९ ऑक्टोबरला उद्घाटन झालं आणि या विमानतळावरुन विमानसेवा सुरु झाली. दरम्यान एका कोल्ह्यामुळे मुंबईवरून आलेल्या विमानाला धावपट्टीवर उतरण्यासाठी दहा मिनिटे अवकाशात घिरट्या घालण्याची वेळ आली. धावपट्टीवर अचानक आलेल्या कोल्ह्यामुळे यंत्रणेचीही तारंबळ उडाली.

सिंधुदुर्ग चिपी विमानतळ धावपट्टीवर कोल्हा असल्याचे वैमानिकाला समजले. त्यानंतर तात्काळ विमान पुन्हा आकाशात झेपावले आणि संबंधित यंत्रणेला या कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढण्यास सांगण्यात आलं. या कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढल्यानंतर दहा मिनिटांनी विमान धावपट्टीवर उतरविण्यात आलं. यामुळे प्रवाशांमध्ये सुरुवातील भिती निर्माण झाली होती. तसेच यावरुन विविध चर्चा रंगल्याचंही पाहायला मिळालं.