अलिबाग येथील रसायनी येथे कचराकुडींजवळ सोडलेल्या एका नवजात अर्भक अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांनी जीवदान दिले आहे. यशस्वी उपचारानंतर बालकाला वास्तल्य ट्रस्टच्या स्वाधीन करण्यात आले. रसायनी पोलिसांनी यात महत्वाची भूमिका बजावली आहे.

रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत डंपिंग ग्राउंडवर १ सप्टेंबर रोजी अर्भक आढळून आले होते. रसायनी पोलिसांना एका महिलेने याबाबतची माहिती दिली होती. माहिती मिळताच पोलीसांनी तात्काळ तिथे धाव घेत पुरूष जातीच्या या अर्भक ताब्यात घेतले होते. त्यानंतर रात्री साडेबाराच्या सुमारास बालकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले गेले. त्यावेळी अर्भकाची प्रकृती चिंताजनक होती. त्याचे वजनही कमी होते. शिवाय त्याला धापही लागत होती. पोटात रक्तस्राव झाला होता. गेले २१ दिवस त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.

रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारीकांनी बालकाची काळजी घेतल्याने त्याची प्रकृती आता सुधारली आहे. तसेच, त्याचे वजन एक किलो ९२० ग्रॅम पर्यंत वाढले आहे. त्यामुळे त्याला मंगळवारी रुग्णालयातून वात्सल्य ट्रस्टच्या अनाथाश्रमाकडे सोपविण्यात आले. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने यांच्या उपस्थितीत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी त्याला रुग्णालयातून निरोप दिला.

रसायनी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार डी.जी. देडे, पी.आर जंगम यांनी २२ दिवस या बालकाची रुग्णालयात राहून काळजी घेतली. बालरोग तज्ज्ञ डॉ.एम.एस.क्षीरसागर, डॉ.आशिष पाटील, डॉ. मंजुश्री शिंदे, डॉ.सागर खेदु, डॉ.प्रीतम वरसोलकर, डॉ.पोटे व परिचारिका यांनी या बालकाची काळजी घेऊन त्याला नवीन जीवन दिले आहे.