स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अनुयायांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात उमरी येथे बँकेवर टाकलेला दरोडा नंतरच्या काळात ‘शौर्यगाथा’ म्हणून सुवर्णाक्षरांनी नोंदविला गेला. पण स्वामीजींचे नाव असणाऱ्या नांदेडच्या विद्यापीठातील कॉलेज व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक व्ही. एम. मोरे यांच्या नावावर ‘लेखनचौर्या’ची नोंद झाली आहे. या चौर्यकथेमुळे विद्यापीठाची प्रतिमा डागाळली आहे.
असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या वतीने ‘युनिव्हर्सिटी न्यूज’ हे साप्ताहिक प्रकाशित केले जाते. या साप्ताहिकाच्या १५ ते २१ ऑक्टोबर २०१२च्या अंकात व्ही. एम. मोरे यांच्या लेखाला मुखपृष्ठ कथेचे स्थान मिळाले आहे. ‘अ‍ॅकेडमिक रिफॉम्र्सस् इन हायर एज्युकेशन : ए केस ऑफ एसआरटीएमयू’ असे लेखाचे शीर्षक असून तो वाचताना प्राध्यापक व अधिकाऱ्यांसमोर ही ‘चौर्यकथा’ ठसठशीतपणे उभी राहिली. विसाव्या वर्षांकडे वाटचाल करणाऱ्या स्वारातीम विद्यापीठाने मागील काही वर्षांत उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली. ‘थिंक नोबली, अ‍ॅक्ट ग्लोबली’ हा विचार कृतीत उतरविण्याचा प्रयत्न चालवला आहे. डॉ. सर्जेराव निमसे यांच्या कुलगुरूपदाच्या कारकीर्दीस जुलैमध्ये ४ वर्षे पूर्ण झाली, त्या वेळी हे विद्यापीठ आगामी पाच वर्षांत देशातील पहिल्या १० विद्यापीठात गणले जाईल, असे नियोजन केले जात असल्याचे सांगण्यात आले. पण याच विद्यापीठात शैक्षणिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांचे ‘लेखनचौर्य’ समोर आल्यानंतर तो चर्चेचा विषय झाला असून आता संबंधितांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. व्ही. एम. मोरे हे कुलगुरूंच्या निकटच्या वर्तुळातील आहेत. वरील लेख लिहिताना त्यांनी एकाही संदर्भाचा आधार घ्यावा लागला नाही. पण विद्यापीठातील काही वाचनवेडय़ांनी हा लेख आरंभापासून अखेपर्यंत वाचला तेव्हा त्यांना नांदेड विद्यापीठाच्या ‘ज्ञानतीर्थ’ परिसराची नव्हे, तर कोल्हापुरातील नामांकित शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक प्रशासन, त्यातील सुधारणा व नावीन्यपूर्ण बाबींची शैक्षणिक सहल घडली. लेखनचौर्य करताना मोरे यांनी नांदेड विद्यापीठाचे संकेतस्थळ नमूद करण्याऐवजी चक्कशिवाजी विद्यापीठाचे  http://www.unishivaji.ac.in  हे संकेतस्थळ टाकून एक मोठा पुरावाच वाचकांच्या हाती सोडला. नांदेड विद्यापीठाचे कार्यक्षेत्र नांदेडसह चार जिल्ह्य़ांचे आहे, पण मोरे यांच्या लेखात काही ठिकाणी कार्यक्षेत्राच्या संदर्भाने तीन जिल्ह्य़ांचा उल्लेख (पृष्ठ ६) आलेला आहे. शिवाजी विद्यापीठाचे कार्यक्षेत्रही तीन जिल्ह्य़ांचे आहे, हे विशेष! यासंदर्भात शिवाजी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, मोरे यांचे ‘लेखनचौर्य’ त्यांच्याही निदर्शनास आल्याचे स्पष्ट झाले. त्या विद्यापीठाने ‘नॅक’कडे एक संपादित पुस्तक  २००८ साली सादर केले होते. त्यात रिफॉम्र्सस इन अ‍ॅकेडमिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या मथळ्यातील लेखात शिवाजी विद्यापीठाच्या नव्या प्रयोगाची माहिती दिली होती. नांदेड विद्यापीठातील तथाकथित शैक्षणिक सुधारणांची माहिती संपूर्ण भारतातील विद्यापीठे आणि उच्चशिक्षण विश्वाला करून देण्यासाठी मोरे यांनी वरील लेखातील परिच्छेदाच्या परिच्छेद शब्दश: उचलल्याचे यानिमित्ताने उघडकीस आले आहे.  ज्या बाबीच नांदेड विद्यापीठात नाहीत, अशा काही लेखनचौर्यातून समोर आल्या. नांदेड विद्यापीठात वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची संकुले आहेत. तर शिवाजी विद्यापीठात विभाग आहेत. उचलेगिरी करण्याच्या नादात मोरे यांच्या लेखात कोठेही स्कूल वा संकुल असा उल्लेख नाही. (शिवाजी विद्यापीठाने ही पद्धत सर्वप्रथम अर्थशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विभागामध्ये सुरू केली होती.) लेखन चोरी करताना मोरे यांनी अभ्यासक्रमाची नावे कायम ठेवून आपल्या विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र संकुलावर अन्याय केला. जे संकुल माजी कुलगुरू धनंजय येडेकर यांनी नावारूपास आणले होते. दुसऱ्या विद्यापीठाने चार वर्षांपूर्वी प्रकाशित केलेल्या लेखातील मुद्दे, परिच्छेद, त्या विद्यापीठातील संकल्पना, त्यांचे प्रयोग याची सरळ उचलेगिरी झाली आहे. नांदेड विद्यापीठ गीताची सुरुवात ‘विद्येची अन् पवित्रतेची इथे वाहते ज्ञानधारा’ अशा ओळींनी झाली आहे. आता लेखनचौर्यामुळे ‘चौर्याची अन् पळवापळवीची इथे वाहते ज्ञानधारा’ असे विडंबन विद्यापीठ परिसरात केले जात आहे.