पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारविरोधात देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी म्हणजेच ‘इंडिया’ची आजपासून मुंबईत दोन दिवसीय बैठक सुरू होत आहे. या बैठकीवरून भारतीय जनता पार्टीसह महायुतीतले पक्ष शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार गट आणि काँग्रेसवर टीका करत आहेत. तसेच या बैठकीचं यजमानपद शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे असल्यामुळे ठाकरे गटाला लक्ष्य केलं जात आहे. इंडिया’च्या बैठकीसाठी खर्च केल्या जाणाऱ्या पैशांवरून शिवसेनेच्या शिंदे गटाने आणि भारतीय जनता पार्टीने प्रश्न उपस्थित केले आहेत. याला आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.

आमदार आदित्य ठाकरे यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, त्यांनी (शिंदे गट आणि भाजपा) आधी सांगावं की सुरतचा खर्च कोणी केला होता? गुवाहाटीचा खर्च कोणी केला होता? चार्टर्ड प्लेनचा खर्च कोणी केला होता? आमदारांना प्रत्येकी ५० खोके दिले त्याचा खर्च कोणी केला होता? या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावी. त्यांनी आमची दसऱ्याची सभा ढापण्याचा प्रयत्न केलेला. त्यावेळी असं ऐकलं की सभेला लोकांना आणण्यासाठी एसटीला १० कोटी रुपये दिले होते. कुठलाही पक्ष अस्तित्वात नसताना हे पैसे कुठून आले? हा सरकारी तिजोरीतून केलेला खर्च होता का? कोणाच्या खिशातून किंवा खोक्यातून हा खर्च केला होता?

आदित्य ठाकरे म्हणाले, भारतीय जनता पार्टीला इंडिया आघाडीची भिती वाटू लागली आहे. इंडिया जिंकतेय हे पाहून ते घाबरले आहेत. म्हणूनच ते इंडियाला लक्ष्य करत आहेत. परंतु, आम्ही त्यांना जिंकू देणार नाही.

हे ही वाचा >> ‘विश्वातले एकमेव भरकटलेले रेल्वे इंजिन’, काँग्रेसने उडवली राज ठाकरेंची खिल्ली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईत इंडियाच्या बैठकीपाठोपाठ महायुतीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीबाबत आदित्य ठाकरे म्हणाले, इंडियाच्या भितीने हे भित्रे लोक एकत्र आले आहेत. ईडीच्या भितीने, एनआयएच्या भितीने पळून गेलेले सगळेजण एकत्र येत आहेत. परंतु, आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार नाही. राज्यातला शेतकरी त्रस्त आहे, महिलांचा आवाज कोणी ऐकत नाही, आम्ही या सगळ्यांसाठी लढत आहोत.