अन्न व औषध प्रशासनाने शनिवारी तीन लाख रुपयाचे भेसळयुक्त तूप पकडले. या प्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू होती.
किरण किशोर सुरतवाला यांच्या मालकीच्या मे. जे. के. सुरतवाला अँड कंपनीच्या गुरुनानक मार्केट परिसरातील गोदामावर छापा टाकण्यात आला. तेथे दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने भेसळयुक्त तूप सापडले. तब्बल ६३२ लिटर तूप अधिकाऱ्यांनी जप्त केले. त्याची बाजारातील किंमत सुमारे तीन लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी प्रवीण काळे यांनी विशेष मोहीम राबविली. कोणत्या प्रकारचा भेसळयुक्त माल बाजारात आला, याची माहिती घेऊन कारवाई करण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वी मदा, रवा पकडल्यानंतर शुक्रवारी अधिकाऱ्यांनी जुना मोंढा परिसरातील दुकानात छापा टाकून एक लाख रुपयांचा भेसळयुक्त तेलसाठा जप्त केला होता.
दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर अनेक मिष्ठान्न दुकाने थाटली आहेत. त्यातून नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. भेसळयुक्त मिष्टान्न नागरिकांना विकल्या जाऊ नये, या साठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनीही आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.