बांधून पूर्ण झालेल्या किंवा काम सुरू असलेल्या रस्त्यांची प्रत्यक्ष अवस्था काय आहे हे आता इंटरनेटद्वारे त्वरित माहिती होऊ शकणार आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्तेबांधणीच्या कामाची पाहणी करण्यासाठी सरकारतर्फे एक नवीन सॉफ्टवेअर वापरले जाणार आहे. या सॉफ्टवेअरद्वारे रस्त्याच्या कामांची सद्य:स्थिती काही वेळातच इंटरनेटवर कळू शकणार आहे.
‘सी-डॅक’ या संस्थेतर्फे हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. राष्ट्रीय ग्रामीण रस्ते बांधणी विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. रस्ते विकास मंत्रालयाचे सचिव एस. विजय कुमार, सहसचिव डॉ. पी. के. आनंद, ग्रामीण विकास मंत्रालयाचे मुख्य सचिव एस. एस. संधू, प्रभाकांत कटारे, हेमंत दरबारी या वेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर या योजनेअंतर्गत रस्त्यांच्या पाहणीसाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. हे नवीन सॉफ्टवेअर वापरून रस्त्याची पाहणी करणारे प्रत्यक्ष स्थळावरून रस्त्याची छायाचित्रे काढून ती संकेतस्थळावर अपलोड करू शकणार आहेत. याद्वारे ही छायाचित्रे आणि रस्त्यांविषयीची सांख्यिक व इतर माहिती नागरिकांना https://online.omms.nic.in/ वर पाहता येईल. रस्त्यांची पाहणी करणाऱ्यांना हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी अँड्रॉईड बेस्ड मोबाइल फोन आणि आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
एस. विजय कुमार म्हणाले, ‘‘ प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेवर सरकारने आतापर्यंत एक लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे. बांधलेले रस्ते किमान वीस वर्षे चांगल्या अवस्थेत टिकून राहणे अपेक्षित आहे. यासाठी वेळोवेळी रस्त्यांची पाहणी करून ते सुस्थितीत आहेत का हे पाहणे महत्त्वाचे आहे. या सॉफ्टवेअरमुळे रस्त्यांचा प्रत्यक्ष वापर करणाऱ्या नागरिकांना रस्त्यांची माहिती मिळेल आणि योजनेच्या कामकाजाची पारदर्शकता वाढेल.’’