गाडगीळ समितीचा अहवाल सरसकट सरकारने स्वीकारल्यास कोकणचे मोठे नुकसान होईल हे भाजपलाही मान्य आहे. त्यासाठी येत्या अधिवेशनात दोन्ही सभागृहांत या अहवालावर संयुक्त चर्चा करून केंद्र सरकारला गाडगीळ अहवालाच्या बाबतचा अभिप्राय कळवावा अशी आग्रही मागणी करू, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
विरोधी पक्षनेते विनोद तावडे येथील विश्रामगृहावर बोलत होते. या वेळी आमदार प्रमोद जठार, जिल्हा भाजप अध्यक्ष अतुल काळसेकर आदी उपस्थित होते.
कोकणातील सणांचा व सुट्टीचा हंगाम लक्षात घेऊन कोकण रेल्वेने गाडय़ांचे नियोजन करावे, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली. गणेश चतुर्थी, शिमगा, मे महिना, मोठे जत्रोत्सव या पाश्र्वभूमीवर गाडय़ांचे वेळापत्रक कोकण रेल्वेने करावे, असे तावडे म्हणाले.
कोकणातील खासदारांनी त्यासाठी एकत्रित केंद्रीय रेल्वे मंत्रालयावर दबाव आणला पाहिजे, असे सांगताना ना. तावडे म्हणाले, चाकरमानी मुंबईत आहेत, पण तेथील खासदार तथा केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, खासदार संजय निरुपम व खासदार प्रिया दत्त हे अनुक्रमे राजस्थान, बिहार व उत्तर प्रदेशमधील प्रवाशांसाठी नियोजन करतील. त्यांचे कोकणच्या चाकरमान्याशी देणेघेणे नसल्यासारखेच वागणे राहील, असे ना. तावडे म्हणाले.
दिवा पॅसेंजरप्रमाणे हंगामात मुंबईपर्यंत पॅसेंजर सोडावी. मात्र बारमाही गाडय़ा चालविणे कोकण रेल्वेला आर्थिकदृष्टय़ा परवडणार नाही, असे ना. तावडे म्हणाले.
येत्या अधिवेशनात कोकणच्या विकासाच्या मुळावर येणाऱ्या गाडगीळ अहवालावर दोन्ही सभागृहांत चर्चा व्हावी म्हणून सरकारसमोर मांडून संयुक्त चर्चेस सरकारला तयार करू. दोन्ही सभागृहांत कोकणचा आवाज उठवून केंद्रीय पर्यावरण खात्यावर दबाव आणला जाईल, असे ना. तावडे म्हणाले. गाडगीळ अहवाल सरसकट स्वीकारण्यास आपला विरोध राहील. पण चांगल्या सूचनांना पाठिंबा राहील. पण कोकणचा विकास रोखणाऱ्या मुद्दय़ांना विरोध असेल, असे ना. तावडे म्हणाले.
पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या प्रकल्पांना विरोध करताना कोकणच्या जनतेच्या विकासाच्या विचारावर विधिमंडळ अधिवेशनात संयुक्त चर्चेस सरकारला भाग पाडू, असे ना. विनोद तावडे म्हणाले.
जलसंपदा विभागाच्या श्वेतपत्रिकेला विरोधी पक्षांची काळी श्वेतपत्रिका काढून उत्तर दिले जाईल. शिवाय वडणेरी, भेंडगिरी, उपासे व कुलकर्णी समितीच्या पाटबंधारेमधील भ्रष्टाचाराच्या सूचनेची चौकशी व्हायला हवी, तसेच सर्वसंबंधितांवर गुन्हे दाखल व्हावेत म्हणून मागणी राहील, असे ना. विनोद तावडे म्हणाले.
जलसंपदा विभागाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करताना मंत्र्यासह संबंधितावर कारवाई करण्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक होईल, असे ना. तावडे यांनी सांगितले. भ्रष्टाचाराचा पर्दाफाश काळ्या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून करणार, आहोत असे ना. तावडे म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात भाजप भक्कमपणे उभे राहत असल्याचे चित्र ग्रामपंचायत निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्य़ात भाजपला मोठे यश मिळाले आहे. विजयी ग्रामपंचायतीत भाजप चांगली कामगिरी करून दाखवेल, असे ना. तावडे म्हणाले.
सावंतवाडी की मडुरा रोडला रेल्वे टर्मिनस व्हावे या वादाच्या मुद्दय़ावर बोलताना ना. तावडे म्हणाले, नेत्याच्या प्रतिमेला उपयोगी पडेल अशा ठिकाणी टर्मिनस नको. जिल्ह्य़ात टर्मिनस हवे, पण त्यासाठी तांत्रिक व सामान्य माणसांची सोयसुविधा व रेल्वेचे सर्वेक्षण योग्य ठिकाणी असेल तेथे कोकण रेल्वे टर्मिनस व्हावे, असे ना. तावडे यांनी मांडून पालकमंत्री नारायण राणे आणि आ. दीपक केसरकर यांच्या वादाला छेद दिला.