Sharad Pawar Resign : राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा करताच राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी सर्वच स्तरांतून जोर धरु लागली. पवारांनी राजीनामा दिल्याने अनेक पदाधिकाऱ्यांनीही आपल्या पदाचा त्याग करून राजीनामा दिला आहे. तर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनीही आपल्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा देऊन या प्रकरणाला फोडणी दिली आहे. या सर्व प्रकरणानंतर आज त्यांनी पुन्हा माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा लोकशाहीच्या मुल्यांचा आधार घेत शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे.
“माझी भूमिका काल दुपारपासून स्पष्ट आहे, त्यांनी राजीनामा मागे घ्यावा. गेली ४० वर्षे मी शरद पवारांना ओळखतो. ते कायम म्हणतात की लोक कल ज्याबाजूने असेल, कदाचित तो आपल्या मनाविरोधातही असू शकतो, पण लोकशाहीत नेत्याने नेहमी लोक-कलेच्या बाजूने गेलं पाहिजे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
हेही वाचा >> राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ‘या’ पदाचा दिला राजीनामा, म्हणाले…
“लोक-कल काय आहे आज? महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्यांची भावना काय आहे? शरद पवारांनी राजीनामा देऊ नये. शरद पवार आम्हाला सांगतात तर त्यांनी त्यांची शिकवण, लोकशाहीच्या मुल्यांची शिकवण मान्य केली पाहिजे. आजही आमची भूमिका स्पष्ट आहे, त्यांनी राजीनामा मागे घ्यावा”, असंही आव्हाडांनी पुढे स्पष्ट केलं.
सुप्रिया सुळे अध्यक्ष होणार?
शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुप्रिया सुळे अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. आजच हे जाहीर होण्याची शक्यताही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, या विषयी जितेंद्र आव्हाडांना विचारले असता त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “राजकारणात जर तरची भाषा चालत नाही. शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा याच मताचे आम्ही आहोत.”
राजीनामा देताना आव्हाड काय म्हणाले?
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत अनेक पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे. त्यानंतर ते म्हणाले, “लोकशाहीत लोकांचं ऐकलं पाहिजे. लोकांचा जो कल आहे त्यानुसार नेत्याने वाटचाल केली पाहिजे. शरद पवारांनी असा निर्णय का घेतला? त्यांनी आम्हाला विश्वासात का घेतलं नाही? आमचं आयुष्य त्यांच्यासाठी काहीच नाही का? जी लढाई आम्हाला लढायची आहे ती आम्ही शरद पवारांना वगळून कशी लढणार? मी आज माझ्या प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. आमच्या पक्षात शरद पवारांनी नव्या लोकांना घ्यावं. आम्हीही राजीनामा दिला आहे नव्या लोकांना संधी द्या. मात्र शरद पवारांनी पद सोडायला नको”, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.