scorecardresearch

बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक; देवेंद्र फडणवीसांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन, म्हणाले…

बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या काही वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला आहे.

बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक; देवेंद्र फडणवीसांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन, म्हणाले…
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Maharashtra Karnataka Border Dispute: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटल्याचे दिसत आहे. याशिवाय, शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांचा बेळगाव दौरा रद्द झालेला असल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरणही तापलेलं आहे. अशातच आता बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना थेट फोन करून या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दूरध्वनी केला आणि बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनांबद्दल तीव्र शब्दात आपली नाराजी नोंदविली आहे. यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. महाराष्ट्रातून येणार्‍या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केले आहे.” अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

हेही वाचा – Maharashtra-Karnataka Border Dispute : “नपुंसक पद्धतीने राज्य चालवलं जातंय”; अरविंद सावंत यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका!

या घटनेनंतर विरोधी पक्ष अधिकच आक्रमक झाले असून त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. शिवसेना(ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी यावरून टीका करताना म्हटले आहे की, “नपुंसक पद्धतीने राज्य चालवलं जातयं. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद म्हणण्याचा हक्क भाजपाने कायमचा गमावला आहे. इतकं नपुंसकत्व ते सतत सिद्ध करत आहेत. दिल्लीचेही तख्त सोडाच, दिल्ली पुढेही गुडघे टेकतो महाराष्ट्र माझा अशी यांची अवस्था आहे.”

हेही वाचा – Maharashtra-Karnataka Border Dispute : आम्ही बेळगाव दौरा रद्द केलेला नाही, तो केवळ पुढे ढकलला आहे – शंभूराज देसाई

दरम्यान, चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांचा आजचा नियोजित बेळगावचा दौरा महाराष्ट्र सरकारला रद्द करून तो लांबणीवर टाकावा लागला आहे. यामुळेही विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारपरिषद हा दौरा रद्द झाला नाही तर पुढे ढकलावा लागण्या मागचं कारण सांगितलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 15:08 IST

संबंधित बातम्या