जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे शेती व्यवसायाचे कंबरडे मोडले. या अभूतपूर्व संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांची पाठ गारपीट सोडत नसल्याचे चित्र आहे. मागील पंधरवडय़ात उस्मानाबाद तालुक्यातील गुंजेवाडीला झोडपून काढल्यानंतर बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पुन्हा चिलवडी गावाला गारपिटीने झोडपले. सततच्या गारपिटीची कारणे समजू न शकल्याने शेतकरी मात्र पुरता सर्द झाला आहे.
दोन महिन्यांपूर्वी गारपिटीमुळे जिल्ह्यात ६९ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले. गारपीटग्रस्तांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील गारपिटीचे अनुदान अजून हातात पडले नाही, तोच पुन्हा गारपिटीचा तडाखा सहन करावा लागत आहे. गुंजेवाडीपाठोपाठ उस्मानाबाद तालुक्यातील चिलवडी गावाला बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्याने झोडपले. वादळी वारा, पावसाबरोबर अचानक गारपीट सुरू झाल्यामुळे शिवारात काम करणारे शेतकरी व मजुरांना गारांचा मार सहन करावा लागला. सुपारीएवढय़ा आकाराच्या गारा असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांबरोबरच जनावरांनाही गारांचा मोठा मार बसला. अनेक ठिकाणी अजूनही ज्वारी पीककाढणी, मळणीची कामे सुरू आहेत. त्यातच गारपीट होत असल्यामुळे पूर्वीच्या तडाख्यातून शिल्लक राहिलेली ज्वारीही धुळीत मिसळली जात आहे.
सतत सुरू असलेल्या या नसíगक आपत्तीची कारणे अजूनही प्रशासन वा हवामानतज्ज्ञांकडून स्पष्ट होऊ शकली नाहीत. आमच्याच वाटय़ाला सतत गारपीट का, या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला आज तरी कोणाकडेही उत्तर नाही. गारपीट अजून किती काळ होणार, त्यामुळे शेतजमिनीचा पोत खालावणार का, अशा अनेक प्रश्नांमुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. चिलवडीत झालेल्या गारांचा आकार व त्याचे स्वरूप पाहता, शेतीला त्याचा मोठा फटका बसणार असल्याचे प्राथमिकदृष्टय़ा स्पष्ट होत आहे. कांद्याच्या पिकाप्रमाणे शेतजमिनीस या गारा बाधा पोहोचवणार काय, याची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st May 2014 रोजी प्रकाशित
उस्मानाबादेत पुन्हा गारपीट
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे शेती व्यवसायाचे कंबरडे मोडले. या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांची पाठ गारपीट सोडत नसल्याचे चित्र आहे. मागील पंधरवडय़ात झोडपून काढल्यानंतर बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पुन्हा चिलवडी गावाला गारपिटीने झोडपले.

First published on: 01-05-2014 at 01:57 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Again hailstorm osmanabad