पाणीप्रश्न तीव्र असताना आंदोलन करणाऱ्यांना साधा पाठिंबाही न देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या तोंडावर जायकवाडीचा मुद्दा उचलून धरण्याचा प्रयत्न चालविला आहे. भाजप महिला मोर्चाने जायकवाडीच्या हक्काच्या पाण्यासाठी उद्या (शुक्रवारी) थाळीनाद आंदोलन करण्याचे ठरविले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता हे आंदोलन होईल, असे शहराध्यक्ष अॅड. माधुरी देशमुख यांनी कळविले आहे.
जायकवाडीतील हक्काच्या पाण्यासाठी मराठवाडा जनता विकास परिषद, जायकवाडी संघर्ष समिती यांनी गेल्या वर्षी आंदोलने केली. हा मुद्दा राजकीय पटलावर यावा. राजकीय नेत्यांनी विधानसभेत त्यावर मत प्रदर्शित करावे, या साठी प्रयत्न झाले. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही आंदोलनात उतरविण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी पाणी परिषदही घेतली. भाजप नेते मात्र या प्रश्नी नेहमीच मौन बाळगून होते. कोणी तरी आवर्जून टोकले तरच आंदोलन करू, असे पक्षाकडून सांगितले गेले. मात्र, म्हणावे तसे मोठे आंदोलन भाजपने उभारले नाही. भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनाही माहिती देण्यात आली. पण आंदोलन उभारले गेले नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी पाणीप्रश्न महिला मोर्चाने हाती घेतला आहे. जायकवाडीत १४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यातील ५ टीएमसी पाणी शेतीला दिल्यास ९ टीएमसी पाणी शिल्लक राहते. हे पाणी मराठवाडय़ाला पुरणार नाही. टंचाई निर्माण होईल, असा दावा भाजपने केला आहे.