पाच वर्षांपूर्वी कृषी कार्यालयाकडे दाखल केलेल्या सामूहिक शेततळ्यांच्या प्रस्तावांची सेवाज्येष्ठता डावलून काही प्रस्ताव थेट पैसे घेऊन मंजूर करण्यात आल्याचा आरोप करीत तालुक्यातून दाखल करण्यात आलेल्या सर्व ३०० शेततळ्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत, या मागणीसाठी आ. दादा भुसे यांनी सोमवारी सायंकाळी येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात अचानक ठिय्या आंदोलन सुरू केल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. जिल्हा कृषी अधीक्षकांनी येथे येऊन या प्रश्नी ठोस कृती केल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका भुसे यांनी घेतली असून त्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक सायंकाळी उशिरा येथे दाखल झाले.
२००७-०८ पूर्वी कृषी खात्याने सामूहिक शेततळ्यांचे प्रस्ताव मागितले. त्यानुसार तालुक्यातून एकूण १०६ प्रस्ताव दाखल झाले होते. या प्रस्तावांची सेवाज्येष्ठता डावलून नाशिक येथील कृषी अधीक्षक कार्यालयाने गेल्या डिसेंबर महिन्यात नव्याने प्रस्ताव स्वीकारण्याचे धोरण अवलंबले. त्यानुसार किमान ३०० प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यातील फक्त ७५ शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्यात आली आहे. त्यातही फारच थोडय़ा जणांना प्रत्यक्षात कार्यारंभ आदेश देण्यात आला असल्याची तक्रार भुसे यांनी केली आहे.
शेततळ्यांची पूर्वसंमती देताना प्रतीक्षा यादी डावलण्यात आली असून त्यासाठी ५० हजारांची रक्कम उकळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच सतत निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता कृषी खात्याकडे दाखल सर्व ३०० प्रस्ताव लगेच मंजूर करावेत, असा आग्रह भुसे यांनी धरला आहे.