अहिल्यानगरः गेल्या पाच वर्षांपासून रखडलेले जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समितीने १९ जणांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत खेळाडू (पुरुष व महिला) व दिव्यांग गुणवंत खेळाडू प्रकारात हे पुरस्कार जाहीर केले आहेत.
यात सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३, व २०२३-२४ या पाच वर्षाकरिता गुणवंत खेळाडू (पुरुष व महिला) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, सन २०१९-२० करिता गुणवंत क्रीडा कार्यकर्ता/संघटक पुरस्कारार्थीची निवड करण्यात आलेली आहे. पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रुपये १० हजार असे आहे. दि. १ मे रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांनी सांगितले.
पुरस्कारासाठी एकूण ७२ क्रीडा मार्गदर्शक खेळाडूंनी प्रस्ताव दाखल केले होते. त्यातील १९ जणांची निवड करण्यात आली. सन २०१९-२० चे पुरस्कारः गुणवंत क्रीडा कार्यकर्ता / संघटक – दिनेश लक्ष्मण भालेराव, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक – डेविड सुरेश मकासरे, (पावरलिफ्टिंग). गुणवंत खेळाडू-सोमनाथ अविनाश सपकाळ (बेसबॉल), अपूर्वा गोरक्ष गोरे (सायकलिंग), सुहास शंकर मोरे (मैदानी) व (थेट पुरस्कार) फिजा फत्तू सय्यद (सॉफ्टबॉल).
सन २०२०-२१ चे पुरस्कार-गुणवंत क्रीडा मार्गदर्शक : प्रा. डॉ. विजय लक्ष्मण म्हस्के (व्हॉलीबॉल), गुणवंत खेळाडू पुरस्कार: करण संदीप गहाणडुले (मैदानी), वैष्णवी सुनील गोडळकर (तलवारबाजी). सन २०२१-२२ चे पुरस्कारः गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार : प्रा. विजय यशवंत देशमुख (वेटलिफ्टिंग). गुणवंत खेळाडू पुरस्कारः श्रीनिवास शिवाजी कराळे (मैदानी), विश्वेशा विजयसिंह मिस्कीन (मैदानी).
सन २०२२-२३ चे पुरस्कार: गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार-श्रीरामसेतू सुधाकर आवारी (मैदानी), गुणवंत खेळाडू पुरस्कार – ओम बाबासाहेब करांडे (सायकलिंग), कोमल नारायण वाकळे (वेटलिफ्टिंग). सन २०२३-२४ चे पुरस्कारः गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार – लक्ष्मण भगवान उदमले (वुशू), गुणवंत खेळाडू पुरस्कार- ओंकार मनीष सुरग (तलवारबाजी), योगिता जगन्नाथ खेडकर (वेटलिफ्टिंग). तसेच विशेष बाब पुरस्कार – शंकर भीमराज गदाई (कबड्डी).