नगर : शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागाला लागलेल्या अग्निकांड प्रकरणात मंगळवारी वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिका अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांसह चौघांना निलंबित केल्याचे काल, सोमवारी जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात आज सायंकाळपर्यंत निलंबनाचे आदेश येथे प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा मंगळवारी कार्यरत होते.

शनिवारी सकाळी अतिदक्षता विभागात आग लागून ११ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. या गुन्ह्य़ात चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.

वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक करण्यात आली आहे. यातील शिंदे आणि पठारे यांना निलंबित करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले होते तर शेख आणि आनंत यांच्या सेवा समाप्तीचा आरोग्य विभागाचा आदेश आहे.

दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक पदाची सूत्रे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषणकुमार रामटेके यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गंडाळ यांनी दिले. डॉ. पोखरणा यांच्यासह डॉ. सुरेश ढाकणे, डॉ. विशाखा शिंदे व परिचारिका सपना पठारे या चौघांविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव डॉ. गंडाळ यांनी काल मंत्रालयात पाठवला.

कर्मचाऱ्यांकडून निषेध

दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील परिचारिका व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांनी परिचारिकांना या गुन्ह्य़ात अटक केल्यामुळे निषेध नोंदवला असून ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप केला आहे. यामधील प्रमुख सूत्रधाराला अटक करण्याची मागणी केली आहे. संघटनांनी सकाळी एक तास काम बंद आंदोलन करत राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा रुग्णालयाच्या आवारात दिल्या.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई

पोलिसांनी तपासात अतिदक्षता विभाग व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले. अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही बंद पडलेले आढळले. मात्र काही सीसीटीव्ही फुटेजमधून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आग लागल्यानंतर रुग्णांच्या बचावासाठी प्रयत्नच केले नसल्याचे आढळले आहे. चौघांच्या अटकेमागील हे एक प्रमुख कारण असल्याचे समजते.