Shalinitai Patil on Ajit Pawar : अजित पवार हे घोटाळेबाज आहेत, विविध घोटाळ्यांमध्ये, गुन्ह्यांमध्ये अडकलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते असं वक्तव्य शालिनीताई पाटील यांनी केलं आहे. तसंच शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घाईने घेतला. त्यांनी इतक्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती असंही शालिनीताई पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच अजित पवार यांच्या पाठीशी भाजपाच्या मोठ्या नेत्याचा हात आहे त्यामुळेच अजित पवार यांची एकदाही ईडीकडून चौकशी झालेली नाही असंही शालिनीताई पाटील यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांच्या पाठीशी भाजपा नेत्याचा हात

शरद पवार यांनी निवृत्ती घेतली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष ठरवायचा असेल तर सुप्रिया सुळेंकडेच ते पद जावं. कारण सुप्रिया या पदासाठी सक्षम आहे. अजित पवार हे गुन्ह्यांखाली अडकलेले घोटाळेबाज नेते आहेत. त्यांना राष्ट्रवादीचं अध्यक्षपद देणं चुकीचं ठरेल असंही शालिनीताई पाटील यांनी म्हटलं आहे. शालिनीताई पाटील पुढे म्हणाल्या की, आमदार हसन मुश्रीफ यांना १०० कोटींच्या मनी लाँड्रींग प्रकरणात ईडी चौकशीसाठी बोलावते मग अजित पवारांना १४०० कोटींच्या मनी लाँड्रींग प्रकरणात चौकशीसाठी का बोलवत नाही? अजित पवारांच्या पाठिशी भाजपाचा बडा नेता आहे. त्यामुळे अजित पवारांना व्यवस्थित सावली मिळाली आहे. कुठल्याही चौकशीहीसाठी त्यांना बोलावलं जात नाही. मात्र अजित पवारांना कधीही अटक होऊ शकते एवढे गुन्हे आणि आरोप त्यांच्यावर आहेत.

शरद पवारांनी लवकर निवृत्ती जाहीर केली

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्यावरही शालिनीताई पाटील यांनी भाष्य केलं. शालिनीताई म्हणाल्या की शरद पवार यांनी असा निर्णय घेताना घाई केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करायला हवी होती. शरद पवारांनी निवृत्ती जाहीर केली असली तरीही जोपर्यंत समिती निर्णय घेत नाही तोपर्यंत हा निर्णय मान्य होणार नाही. माझं वय ९० वर्षे आहे मी अजूनही कामकाज सांभाळते शरद पवार माझ्यापेक्षा लहान आहेत त्यांनी निवृत्त व्हायला घाई केली आहे असं शालिनी पाटील यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलं आहे.