scorecardresearch

अजित पवारांनी सांगितली राजकीय आयुष्यातली ‘ती’ मोठी चूक; म्हणाले, “२००४ मध्ये…!”

अजित पवार म्हणतात, “..तेव्हा मुख्यमंत्रीपदाबाबत आमच्या मनात स्पष्टता होती. पण निर्णय घेणारे आमचे वरीष्ठ नेते होते!”

ajit pawar (3)
अजित पवारांनी सांगितली 'ती' चूक! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या हजरजबाबी आणि सडेतोड स्वभावामुळे परिचित आहेत. त्यांच्या या स्वभावामुळेच अनेकदा त्यांनी केलेली अशीच हजरजबाबी वक्तव्य चर्चेचा विषय ठरतात. यामुळे अजित पवार काही वेळा वादात सापडल्याचंही दिसून आलं आहे. मात्र, त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे त्यांनी केलेल्या विधानांची जास्त चर्चा होते. एका मुलाखतीमध्ये अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्याची अशीच चर्चा आता सुरू झाली आहे. २००४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलेलं असताना झालेल्या घडामोडींचा संदर्भ देत अजित पवारांनी हे विधान केलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

या मुलाखतीमध्ये अजित पवारांना राजकीय जीवनात केलेल्या चुकांविषयी विचारणा केली असता अजित पवारांनी एक मोठी चूक वाटत असल्याचं सांगितलं. “ते आता सांगण्यात अर्थ नाही. पण एक मोठी चूक वाटते की २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्रीपद सोडायला नको होतं. कुणालाही मुख्यमंत्री करायचं होतं. आर. आर. पाटील, छगन बुजबळ किंवा आमच्या वरिष्ठांच्या मनात जे होते त्या कुणालाही करायला हवं होतं”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचे महत्त्वाचे भाष्य; म्हणाले, “भल्या सकाळी…”

मुख्यमंत्रीपद सोडण्याचा निर्णय कुणाचा?

दरम्यान, २००४ मध्ये मुख्यंमत्रीपद सोडण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमका कुणी घेतला? यासंदर्भातही अजित पवारांना यावेळी विचारणा करण्यात आल्यानंतर त्यावर त्यांनी मिश्किल शैलीमध्ये उत्तर दिलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळूनही मुख्यमंत्रीपद काँग्रेससाठी सोडण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतला होता. त्यावर अजित पवारांनी नाराजीही बोलून दाखवली.

“तेव्हा आम्ही क्लिअर होतो. पण त्यावेळी आमच्या निर्णय प्रक्रियेत बोलणारे कोण होते? आमचे सर्वोच्च नेते, प्रफुल्लभाई, मधुकर पिचड, छगन भुजबळ, पद्मसिंह पाटील, विजयसिंह पाटील हे आमचे नेते होते. त्यांनी सांगायचं आणि आम्ही जी म्हणायचं असं होतं”, असं अजित पवारांनी यावेळी सांगत या चुकीसाठी अप्रत्यक्षपणे शरद पवार आणि पक्षातील त्या वेळच्या इतर वरीष्ठ नेत्यांना जबाबदार धरलं आहे.

“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून ज्या लाजिरवाण्या पद्धतीने पायउतार…” अजित पवार यांचं रोखठोक भाष्य

२०२४ मध्ये पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी आली तर?

दरम्यान, यावेळी अजित पवारांना २०२४ मध्ये पुन्हा मुख्यमंत्रीपद आल्यास काय कराल? अशी विचारणा करण्यात आली. त्यावेळी अजित पवारांनी मिश्किल टिप्पणी केली. “आत्याबाईला मिशा असत्या तर छान झालं असतं तसं सांगण्यासारखं आहे. झाल्यावर दाखवतो काय करायचंय ते”, असं अजित पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 14:53 IST