‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’च्या कार्यकारिणी सभेचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत असताना काही सदस्यांनी आपल्यावर बिनबुडाचे आरोप करीत बेकायदेशीररीत्या पदावरून दूर केल्याचा आरोप विजय कोंडके यांनी केला आहे. महामंडळात सुरू असलेला भ्रष्टाचार इतर सदस्यांसमोर येऊ नये, यासाठी आपल्याला अध्यक्षपदावरून दूर करण्यात आल्याचे कोंडके यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. महामंडळाच्या या निर्णयाविरोधात आपण न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असून न्यायालयाने अध्यक्षपदाच्या निवडीवर स्थगिती आणली आहे. त्यामुळे ८ नोव्हेंबरला विजय पाटकर यांची अध्यक्षपदावर झालेली नेमणूक बेकायदेशीर असल्याचा दावाही कोंडके यांनी केला.
महामंडळातील अनेक घोटाळे उघडकीस येणार होते. म्हणूनच महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यावर दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा आणि त्या प्रकरणी मंडळाचे सदस्य सुरेंद्र पन्हाळकर, छाया सांगावकर, अर्जुन नलावडे यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात केलेल्या दिरंगाईचा ठपका ठेवत आपल्याला पदावरून तडकाफडकी हटविण्यात आले, असा आरोप विजय कोंडके यांनी केला आहे. महामंडळाच्या अध्यक्षपदावरच्या कार्यकाळात प्रसाद सुर्वे यांनी महामंडळात केलेला ७ लाख ३४ हजार रकमेचा घोटाळा, त्यांनीच आयोजित केलेल्या ‘वाईभूषण’ या खासगी कार्यक्रमासाठी महामंडळाच्याच तिजोरीतून २६ हजार रुपयांचा खर्च तसेच ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमाच्या आयोजनात झालेल्या बेहिशेबी खर्चाचा अध्यक्ष या नात्याने आढावा घेण्याचा प्रयत्न केल्यामुळेच आपल्यावर डूक धरला असल्याचा दावा त्यांनी केला.
संग्रहित लेख, दिनांक 19th Nov 2014 रोजी प्रकाशित
मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षाची निवड बेकायदेशीर
‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’च्या कार्यकारिणी सभेचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत असताना काही सदस्यांनी आपल्यावर बिनबुडाचे आरोप करीत बेकायदेशीररीत्या पदावरून दूर केल्याचा आरोप विजय कोंडके यांनी केला आहे.
First published on: 19-11-2014 at 02:47 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akhil bharatiya chitrapat mahamandal elections