अकोल्याच्या बायपास भागातील गंगानगर भाग-२ येथील दीपक पवार या सफाई कर्मचाऱ्याच्या आलिशान बंगल्यातून ४ लाख ७८ हजार रुपयांच्या बनावट नोटा व सोने हस्तगत करण्यात आले. बाळापूरचे उपविभागीय अधिकारी गणेश गावडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी व अकोला पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. २७ फेब्रुवारीच्या रात्री सुमारे ८ वाजता सुरू झालेली ही कारवाई पहाटेपर्यंत सुरू होती.
काही दिवसांपूर्वीच बाळापूर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून रुजू झालेले गणेश गावडे यांना याबाबत गुप्त माहिती मिळाल्यावरून त्यांनी अकोला पोलिसांसह गुरुवारी रात्री ही कारवाई केली. या छाप्यात ४ लाख ७८ हजार रुपयांच्या बनावट नोटांसह या नोटा बनविण्यासाठी वापरले जाणारे लॅपटॉप, स्कॅनर, कागद, शाई, कटर, बनावट बॉन्ड, बनावट धनादेश, नोटांच्या आकाराचे कापलेले कागद, असे साहित्य हस्तगत करण्यात आले. एवढेच नव्हे, तर या छाप्यात या बंगल्यातील देवघराशेजारी जमिनीत पुरलेल्या तिजोरीतून सोन्याचा साठाही हाती लागला. सोबतच २ लाख ३६ हजार ९०० रुपयांच्या खऱ्या नोटाही या कारवाईत हस्तगत करण्यात आल्या. या छाप्यात एक नोंदवही आढळून आली. या नोंद वहीमधील नोंदींवरून याठिकाणी बनविल्या जाणाऱ्या बनावट नोटांचा उपयोग अवैध सावकारीसाठी केला जात असल्याचे निदर्शनास आल्याचेही जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषदेत सांगितले.
या प्रकरणातील मुख्य आरोपी दीपक पवार फरारी असून मनोज पवार व सूरज गोयर या दोघांना पोलिसांनी अटक केली.
शहरात हा बनावट नोटांचा कारखाना बऱ्याच वर्षांपासून कार्यरत होता, परंतु पोलिस दलाने याकडे लक्ष दिले नाही, ही बाब व पोलिस अधीक्षक कार्यालय, गुप्तचर विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेचेही याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले, हेही या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

साधा शिपाई ते मुख्य आरोपी!
मुख्य आरोपी दीपक पवार हा काही वर्षांपूर्वी पशु चिकित्सालयात शिपाई होता. त्याला एका फसवणुकीच्या प्रकरणावरून निलंबित करण्यात आले होते. त्याने गंगानगरात लाखो रुपयांचा आलिशान बंगला बांधला. गेले काही महिने या बंगल्यातून संशयास्पद कारभार सुरू होते. एकटा दीपक पवार इतके मोठे रॅकेट चालविणे शक्य नाही, असे पोलिसांचे मत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे राज्याबाहेरही असण्याची शक्यता पोलिस अधीक्षकांनी व्यक्त करून त्यादृष्टीनेही तपास केला जाणार असल्याचे सांगितले.