मुंबई : राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. त्यानुसार ग्रामीण भागांतील पहिली ते चौथी आणि शहरी भागांतील पहिली ते सातवीचे वर्ग जवळपास पावणेदोन वर्षांनी १ डिसेंबरपासून गजबजणार आहेत.

करोना प्रादुर्भाव ओसरल्याने राज्यातील ग्रामीण भागांत पाचवी ते बारावी आणि शहरी भागांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आल्या. करोना रुग्णआलेखातील घसरण कायम असल्याने पहिलीपासूनचे वर्गही सुरू करण्याची मागणी जोरकसपणे मांडण्यात येत होती. त्यानुसार ग्रामीण भागांतील पहिली ते चौथी आणि शहरी भागांतील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण विभागाने सुरू केला होता.

करोना नियंत्रणासंदर्भातील लहान मुलांसाठीचा तज्ज्ञ डॉक्टरांचा कृती गट, आरोग्य विभाग यांच्याशी विचारविनिमय करून त्यांचे आणि मुख्य सचिवांचे अभिप्राय घेऊन हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला होता.

लहान मुले गेल्या दीड-पावणेदोन वर्षांपासून शाळेत गेलेली नाहीत. ही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिली आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे होते. मुलांची सुरक्षा, शिक्षण आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, त्यासाठी पुरेशी तयारी करून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आता पहिलीपासून ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू होतील, असे गायकवाड यांनी सांगितले.

सुरक्षा तपासणी : लहान मुलांच्या शाळा पोषक आणि आरोग्यदायी वातावरणात सुरू व्हाव्यात, यासाठी पुढील सहा दिवस करोना प्रतिबंधक नियमानुसार शाळास्तरावर सुरक्षेच्या सर्व बाबी तपासण्यावर भर दिला जाईल. वर्गखोल्या प्रदीर्घ काळापासून बंद असल्याने शाळा व्यवस्थापन समिती व पालकांशी चर्चा केली जाईल. शाळा सुरू करण्याबाबतची सविस्तर मार्गर्दशक तत्त्वे लवकरच जाहीर करण्यात येतील, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी सांगितले.