केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात काल (शनिवार) चार तास झालेल्या बैठकीनंतर, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना हे पक्षाचे मूळ नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली आहे. आता दोन्ही गटांना स्वत:च्या पक्षासाठी नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे. सोमवारी, १० ऑक्टोबरला दुपारी १ वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय आयोगाकडे सादर करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी धक्कादायक असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. कालपासून विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : “ कितीही आपटली तरी ‘ठाकरे’ नावाचे वलय काढून घेण्यास…”; अंबादास दानवेंची शिंदे गटावर टीका

अंबादास दानवे म्हणाले, “निवडणूक आयोगाने काल जो निर्णय दिला आहे. या निर्णयाचं आकलन कशा पद्धतीने करावं. मला असं वाटतं ही यंत्रणा कोणत्या दबावाखाली काम करतेय की काय? अशा पद्धतीचा निर्णय आहे असं वाटायला जागा आहे. शिंदे गटाचा याचसाठी अट्टाहास होता का? असा निश्चितपणे आपल्या सर्वांसमोर प्रश्न आहे. भाजपाला कोणताच राजकीय पक्ष नकोय. निवडणूक आयोगाच्या मार्फत भाजपाचा हा कुटील डाव आहे. कारण, जनतेच्या दरबारात तर शिवसेनेला कोणी थांबवू शकत नाही. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व हे एक झळाळी प्राप्त झालेलं नेतृत्व महाराष्ट्राच नव्हे तर देशपातळीवर निर्माण झालेलं नेतृत्व आहे. त्यामुळे अशा नेतृत्वाशी समोरासमोर लढता येत नसल्याने अशा पद्धतीने पाठीत खंजीर खूपसण्याचं काम हे भाजपाकडून झालेलं दिसतं. एखाद्या गल्लीबोळातील लहान मूल देखील सांगेल की हा निर्णय कशा पद्धतीने झाला असेल.”

नक्की वाचा : निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

याशिवाय “जी गद्दारांची, खोकेवाल्यांची सेना आहे त्यांनी शिंदेच्या नावावर समोर यावे. मग उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नावात शक्ती आहे की गद्दारांच्या नावत शक्ती आहे, हे निश्चित येणाऱ्या काळात महाराष्ट्रच नव्हे तर देशासमोर येईल. जो निर्णय आला तो निश्चितच वेदनादाई जरी असला तरी शिवसैनिकांनी अशा अनेक वेदना सहन केलेल्या आहेत. अनेक संघर्ष पाहिलेले आहेत. यातूनही शिवसेना पुन्हा एका नव्या झळाळीने काम करेल असा विश्वास आमच्या शिवसैनिकांच्याच नव्हे तर संपूर्ण संघटनेच्या मनात आहे.” असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला आव्हानही दिलं.

हेही वाचा : ‘आमचं चिन्ह…’, मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट चर्चेत, ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाले…!

तर “शिवसेनेची एक स्वतंत्र घटना आहे. त्या घटनेप्रमाणे आमदार म्हणजे काही शिवसेना नाही. शिवसेनेचे प्राथमिक सदस्य म्हणजे शिवसेना आहे. शिवसेनेचे शाखा प्रमुख शिवसेना आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख, नेते, उपनेते ही सगळी मिळून शिवसेना आहे. केवळ निवडून आलेले आमदार आणि खासदार म्हणजेच शिवसेना नाही. शिवसेना तर जनता आहे. ही जनता, शिवसेना उद्धव ठाकरेंसोबत आहे. निश्चित यातून पुन्हा एक शक्ती शिवसेनेला प्राप्त होईल. अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना यश प्राप्त करेल.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : ढाल तलवार, रेल्वे इंजिन, मशाल ते धनुष्यबाण…शिवसेनेच्या निवडणूक चिन्हांचा प्रवास

याचबरोबर “आज जनता उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहे. जनतेच्या मनाचा कौल हा केवळ उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे. कारण, असं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे जे सालस आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं आहे. कुठेही जनतेच्या मनाला वेदना होईल अशा पद्धतीने काम न करता, आपण जनतेचं हीत साधू शकतो, हे सगळं साधणारं सर्वव्यापी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आहे. या नेतृत्वावर केवळ शिवसेनेचा नाहीतर अवघ्या महाराष्ट्राचा विश्वास आहे.” असंही यावेळी दानवे यांनी बोलून दाखवलं.