आंबोली धोकादायक दरड कोसळणाऱ्या घाटाची पाहणी जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांच्या पथकाने केली. सार्वजनिक बांधकाम खात्याने आंबोली घाट असुरक्षित ठेवल्याची जाणीव या पथकाला झाली. जिल्हाधिकारी यांनी योग्य त्या सूचना केल्या.
जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह, प्रांताधिकारी सुषमा सातपुते ,तहसीलदार वीरसिंग वसावे, बांधकाम कार्यकारी अभियंता प्रकाश शिंदे, उपअभियंता एन. बी. नवखंडकर, शाखा अभियंता विजय चव्हाण व अधिकारी उपस्थित होते.
आंबोली घाटातील चार-पाच ठिकाणी जिल्हाधिकारी थांबले. त्यांना बांधकाम कार्यकारी अभियंता प्रकाश शिंदे यांनी धोकादायक दरडीची माहिती देत जागा दाखविली, तसेच दरड कोसळू नये म्हणून नेट आणली आहे, पण ही नेट जिवावर उदार होऊन बसविण्यास कंपनीच्या लोकांनी असमर्थता दर्शविली असल्याचे सांगण्यात आले. त्यावर जिल्हाधिकारी सिंह यांनी चर्चा केली.
महादेवगड पॉइंटकडे जाणारा रस्ता अपूर्ण आहे. दरडीची संरक्षक भिंत कामे याबाबत चर्चा झाली. महादेवगड पॉइंटवर सुरू असलेल्या चिऱ्यांच्या कामाबाबत जिल्हाधिकारी यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्याला बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उत्तराने मुलामा दिल्याचे सांगण्यात आले. महादेवगड पॉइंटवर पर्यटकांना बसण्यासाठी सिमेंटचे बेंच करावे व पावसाळी छत्रीसारखे छप्पर असणाऱ्या कामाची संकल्पना या वेळी जिल्हाधिकारी यांनी बोलताना मांडली.
आंबोली घाटातील धबधबे कोसळतात तेथेही दरडीचे दगड खाली येतील अशी भीती आहे. ही स्थिती जिल्हाधिकाऱ्यांच्या या पथकाने पाहिली. जिल्हाधिकारी यांनी बांधकाम खात्याला पावसाळी घाट संरक्षणासाठी सूचना केल्या, तसेच रस्ता सुरक्षितेबाबतही निर्देश दिले. आज भर पावसाळ्यात आंबोली घाटाची पाहणी करण्यात आल्याने आंबोलीवाशीयांनी आश्चर्य व्यक्त केले.