खड्डय़ांवरून राजकीय पक्षांमध्ये ‘खडाजंगी’ सुरू असतानाच आनंदवन प्रकल्पाने निकामी टायर्स, टय़ूब्ज तसेच इतर टाकाऊ वस्तूंचा वापर करून खड्डे बुजवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे. याच टाकाऊ वस्तूंचा वापर करून आनंदवन जवळून जाणाऱ्या चिमूर मार्गावरील खड्डे बुजवण्यात आनंदवन प्रकल्पाला यश आले आहे.
रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे सध्या राज्यातील जनता हैराण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर प्रकल्प प्रमुख डॉ. विकास आमटे यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना खड्डे बुजवण्याच्या संदर्भात आनंदवनने केलेल्या प्रयोगाची माहिती  दिली. टाकाऊ वस्तूंपासून उपयोगी वस्तू तयार करण्याचे प्रयोग आनंदवनने नेहमीच केले आहेत. काही वर्षांपूर्वी निकामी झालेले टायर टय़ूब तसेच प्लास्टिकचे तुकडे वापरून आनंदवनने त्यांच्या विविध प्रकल्पात बंधारे तयार केले. याच पद्धतीने सोमनाथ प्रकल्पात तयार करण्यात आलेला १४० फूट रूंदीचा बंधारा यशस्वी ठरला आहे. याच टाकाऊ वस्तूंचा वापर करून रस्त्यांवरील खड्डे बुजवता येणे शक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ.आमटे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आनंदवन जवळून जाणाऱ्या चिमूर मार्गावरील खड्डे बुजवले.
बांधकाम खात्याची हरकत
टायर व टय़ूबचे तुकडे तसेच सलाइनच्या प्लास्टिक बाटल्या खड्डय़ात टाकून त्यावर थोडा रबर सिमेंटचा थर वापरून खड्डा बुजवला जाऊ शकतो. या पद्धतीने खड्डे बुजवले तर त्या पट्टय़ावर लवचिकता राहते परिणामी वाहन उसळत नाही. या प्रयोगासाठी बांधकाम खात्याने प्रारंभी हरकत घेतली होती. या प्रयोगासाठी डांबर उपलब्ध करून देण्याची विनंतीही या खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी अमान्य केली. अखेर आनंदवनात पादत्राणे निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या रबर सिमेंटचा वापर केल्याचे डॉ. आमटे यांनी सांगितले.
फेव्हिकॉलचाही प्रयोग
सिमेंट ऐवजी आता पादत्राणे निर्मितीसाठी वापरण्यात येणारे फेव्हिकॉल सुध्दा खड्डे बुजविताना कामात येऊ शकते. तसा प्रयोग येत्या एक दोन दिवसात केला जाणार आहे. असे सांगतानाच टायरचे तुकडे नाही तरी जाळले जातात, यातून प्रदूषणात वाढ होते. त्यापेक्षा त्याचा या कारणासाठी वापर करणे केव्हाही योग्य असे डॉ.आमटे यांनी स्पष्ट केले. रस्त्यांवरील खड्डे पावसाळय़ात डांबरीकरण करून बुजवता येत नाहीत. त्यासाठी पावसाळा संपण्याची वाट बघावी लागते. आम्ही विकसित केलेले तंत्र मात्र पावसाळय़ातदेखील अंमलात आणणे शक्य आहे, असे ते म्हणाले.
खड्डय़ांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या संघटनांनी त्यात बेशरमाची झाडे लावणे तसेच मजुरांना मारहाण करण्यापेक्षा टाकाऊ वस्तूंपासून खड्डे बुजवण्याचे कार्यक्रम हाती घेतले तर चांगले होईल.
डॉ. विकास आमटे