अंबा खोरे प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी श्रमिक मुक्ती दल आणि नऊ गाव संघर्ष समितीचे शेतकरी तिनवीरा धरणाच्या ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. आंदोलनाचा आज आठवा दिवस दिवस आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र देऊन त्यांनी ही मागणी केली आहे. रायगड जिल्हयातील समुद्रकाठचे संरक्षक बंधारे फुटून ज्या जमिनी नापीक झाल्या अशा क्षेत्रात मोडणाऱ्या गावांना दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावे आणि दुष्काळग्रस्तांच्या तदतुदीनुसार सर्व आíथक सोयी सुविधा लागू कराव्यात, अशी मागणीही मधुकर ठाकूर यांनी केली आहे.
धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दल व नऊ गाव बचाव संघर्ष समितीने ४ फेब्रुवारीपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे, परंतु आज ८ दिवस होऊनही जिल्हा प्रशासनातील कोणीही अधिकारी या ठिकाणी भेट देण्यास गेला नाही. गोरगरीब शेतकरी महिलांसह उन्हातान्हात आंदोलनास बसले असतना त्यांची साधी दखल जिल्हा प्रशासनाने घेतली नसल्याने जिल्हाधिकारी रायगड यांच्या कडून खुलासा मागविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. कोणत्याही लोककल्याणकारी राज्यप्रणालीसाठी हे नक्कीच भूषणावह नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. लोकहिताचा निर्णय घेऊन अंबा खोरे प्रकल्प राबवला जावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.