युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीवर अंजली दमानिया यांनी खोचक टि्वट केले आहे. भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक विनोद टि्वट करुन आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आदित्य ठाकरे सध्या वरळी विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. आदित्य ठाकरे यांचा वरळीमधून विजय निश्चित मानला जात आहे. कारण त्यांच्यासमोर कोणीही तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवार नाहीय.

हाच मुद्दा पकडून अंजली दमानिया यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले आहे. वरळीमध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. विद्यमान आमदार सुनील शिंदे यांच्यासह सर्व नगरसेवक शिवसेनेचे आहेत. आदित्य ठाकरे यांना आव्हान देऊ शकणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आदित्य यांच्यासाठी वरळीची लढाई अधिक सोपी बनली.

सर्व बाजूंनी हा मतदारसंघ आदित्य यांच्यासाठी सुरक्षित आहे. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेही अपक्ष उमेदवार म्हणून वरळीतून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पण प्रसिद्धी व्यतिरिक्त त्यांना इथल्या जनतेचे पाठबळ मिळण्याची शक्यता नाही. आदित्य यांच्या विजयानंतर शिवसेनेला सुनील शिंदे आणि सचिन अहिर या दोन नेत्यांचे पुर्नवसन करावे लागणार आहे.