भाडेतत्त्वावर चारचाकी घेऊन त्यांची बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये परस्पर विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी गजाआड केले आहे. संबंधित चारचाकी वाहने अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात विक्री केली आहेत. त्यापैकी पोलिसांनी ९ वाहने जप्त केली आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी दिली.

या प्रकरणी मुख्य आरोपी भगवान वाल्मीक देशमुख, नासेरखान अफजल खान (रा. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती) व शेख रेहान शेख शेहदू (रा. करजगाव, ता. चांदूरबाजार) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

खान आणि शेख यांनी बेकायदेशीरपणे भगवान देशमुख याच्याकडून वाहने खरेदी केल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी टूर व ट्रॅव्हल्स व्यावसायिक प्रमोद सोपान टेकाळे (रा. मुकुंदवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून औरंगाबादमधील पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, त्यावरून भगवान देशमुख व विनोद अरबट पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. भगवान देशमुख याने कुठे-कुठे वाहने विक्री केली याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शेषराव खटाने यांच्या पथकाने केला.