भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (२४ ऑक्टोबर) पाकिस्तानला पराभूत केले. या सामन्यात विराट कोहलीने दिमाखदार खेळी करत विजय खेचून आणला. याच सामन्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला. तीन महिन्यांपूर्वी आम्ही असेच खेळलो आणि जिंकलो, असे एकनाथ शिंदे म्हणाले. शिंदे यांच्या याच विधानाचा उद्धव टाकरे गटातील नेते अरविंद सावंत यांनी समाचार घेतला आहे. भारतीय क्रिकेट संघाने मैदानात राहून सामना जिंकला. तुम्ही पाठीत खंजीर खुपसलेला आहे. तुमच्यासारखा भारतीय संघ गद्दार नाही, असे सावंत एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हणाले. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा >>> “भारत-पाकिस्तान सारखाच आम्हीही सामना खेळलो आणि…”; ठाण्यातील ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमात CM एकनाथ शिंदेंची शाब्दिक फटकेबाजी

त्यांनी गद्दारीचा पराक्रम नक्कीच केला असेल. पण देश जिंकण्यासाठी केलेला पराक्रम, विराट कोहलीने केलेल्या फलंदाजीमुळे उभ्या भारताला अभिमान वाटला. तुमच्यासारखे (एकनाथ शिंदे) ते मैदान सोडून पळाले नाहीत. ते मैदानात खेळले आणि मैदानातच जिंकले. तुम्ही मैदान सोडून पळालेली माणसं आहात. तुम्ही पाठीत खंजीर खुपसलेला आहे. गद्दारांनी आपली तुलना त्यांच्याशी (भारतीय क्रिकेट संघ) करू नये. तसं करत असतील तर ते हास्यास्पद आहे, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.

हेही वाचा >>> “लाज वाटत नाही का?” उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यावर टीका करणाऱ्यांवर अरविंद सावंत संतापले, म्हणाले “घरातून…”

एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?

“दिवाळीबरोबच काल भारताने पाकिस्तानविरुद्ध जो सामना जिंकला, त्याचा आनंदही आपण आज साजरा करत आहोत. तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल तर, काल मेलबर्नच्या मैदानातही आपली ‘बाळासाहेबांची शिवसेना’ झळकली होती. कालचा सामना जसा जिंकला, तसाच सामना आम्ही तीन-साडेतीन महिन्यांपूर्वी खेळलो आणि जिंकलोही. तो सामना महाराष्ट्राने, देशाने बघितला. लोकांच्या मनातलं राज्य आणण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्ही सत्तेत येताच, आधी आपली परंपरा, संस्कृती, सण, उत्सव साजरे करण्याची परवानगी दिली”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.