अभिनेते किरण माने हे ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमामुळे घराघरांत लोकप्रिय झाले. त्यांच्या स्पष्ट आणि बेधडक स्वभावामुळे ते कायमच चर्चेत असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची बरीच माहिती आणि अनुभव किरण माने फेसबुकवर शेअर करत असतात. काही वर्षांपूर्वी त्यांना एका लोकप्रिय मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं. याविषयी नुकत्याच ‘कॉकटेल स्टुडिओ’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाष्य केलं आहे.
“तुम्हाला एका मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं त्याविषयी काय सांगाल?” याविषयी विचारलं असता किरण माने म्हणाले, “त्यावेळची खूप गुपितं आहेत मी सगळीच आता सांगू शकत नाही. पण, वेळ आली की यावर जरुर बोलेन. यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. ५ जानेवारीला मी एक पोस्ट लिहिली होती. आम्ही कलाकार समोर फक्त एक प्रेक्षक जरी असला तरी प्रयोग करतो. पण, त्यावेळी आपल्या देशाचे पंतप्रधान एका सभेसाठी पंजाबमध्ये गेले होते आणि तिथे प्रेक्षक कमी आहेत म्हणून ते माघारी फिरले होते. माझ्या पोस्टची त्याच्याशी लिंक लावून मला प्रेक्षकांनी खूप ट्रोल केलं. त्या ५ जानेवारीनंतर पुढच्या दोन-चार दिवसात चक्र अशी काही फिरली की, मला धमक्यांचे फोन येऊ लागले. काही लोकांनी तर पोस्ट लिहिल्या होत्या की, आता लवकरच याला काढून टाकतील वगैरे…त्याचे स्क्रीनशॉट्स आजही माझ्याकडे आहेत.”
हेही वाचा : बाळाच्या जन्मानंतर कार्तिकी गायकवाडने शेअर केला डोहाळे जेवणाचा Unseen व्हिडीओ! म्हणाली, “आईची भूमिका…”
अभिनेते पुढे म्हणाले, “मी स्टार प्रवाहच्या मालिकेत तेव्हा काम करत होतो आणि त्यावेळी वाहिनीच्या मेन पेजवर बॉयकॉट किरण माने अशा कमेंट्स करण्यात आल्या, तशाप्रकारचा ट्रेंड चालवण्यात आला. नागरिकशास्त्रात मला जो अधिकार दिलाय तोच मी पार पाडत होता. त्याजागी जरी काँग्रेसचे सत्ताधारी असते तरी मी टीका केली असती. कलाकारांनी बोललं पाहिजे या मताचा मी आहे. ५ जानेवारीनंतर धमक्या, शिव्या चालू झाल्या. १३ तारखेचं शूटिंग झालं, पॅकअप केलं आणि मला तासाभरात फोन आला की, तुम्ही या मालिकेत आता नसाल…उद्यापासून आम्ही तुम्हाला रिप्लेस करतो. कारण, विचारल्यावर त्यांनी फोन कट केला. त्यानंतर मी चॅनेल हेडला फोन केला त्यांनी उचलला नाही. अजून एका व्यक्तीला फोन त्याने सांगितलं, ‘अरे तुझ्या राजकीय पोस्ट्स हे कारण आहे आणि एका महिलेची तक्रार आहे.’ मी मनात म्हटलं, मी कधीही कॉल टाइम चुकवला नव्हता, मनापासून काम केलं. माझे डायलॉग फेमस झाले होते. मी ती भूमिका फार मनापासून केली होती. मी कधीही कोणाशी उद्धट बोललो नाही. याआधी काही लोकांनी माझ्या तक्रारी केल्या होत्या. चॅनेल हेड आणि आणखी एका व्यक्तीने मला सांगितलं होतं की तक्रारी आल्या आहेत. त्यानंतर मला माझ्याबाजूने मेल लिहायला सांगितला. मी मला न पटणाऱ्या गोष्टी मेलमध्ये लिहून पाठवल्या. हे मालिकेतून मला काढण्याआधी घडलं होतं. त्या गोष्टीला सहा महिने झाले होते. त्याचे माझ्याकडे सगळे पुरावे होते पण, एखाद्या चॅनेल विरोधात लढणं हे कलाकाराच्या दृष्टीने फार अवघड असतं.”
किरण माने पुढे सांगतात, “काही वरिष्ठ नेत्यांना मी भेटलो. या सगळ्या दरम्यान टीव्हीवर फ्लॅश होऊ लागलं की, महिलांशी गैरवर्तन केलं म्हणून मला काढून टाकलं. माझं असं झालं की हे खोटंय…मी त्यांना विचारलं की तक्रार आहे त्यांनी पुढे या आणि मला सांगा. यानंतर सेटवरच्या दोन-तीन महिला पुढे आल्या. मी त्यांना विचारलं काय गैरवर्तन केलं? पण, त्यांना सांगता आलं नाही. त्यातली एक मुलगी जिला मी मुलीसारखं समजायचो ती म्हणाली, ‘मी जाडी आहे म्हणून त्यांनी एकदा कमेंट केली होती.’ ती कमेंट पण नव्हती…एका सीनदरम्यान तिला रक्ताच्या थारोळ्यातून उचलून मी पळतोय असा सीन होता. तेव्हा, मी तिला म्हणालो होतो ‘बापरे! किती जाड झालीये तू…तेव्हा ती पण मला टाळी देऊन हसली होती.’ त्यावर मी तिलाही विचारलं की, मी गैरवर्तन काय केलं? तर, कुणीच काही बोललं नाही. त्यानंतर सेटवरच्या आणखी ४ महिलांचा मला फोन आला आणि त्या म्हणाल्या, ‘किरणजी हे काही पटत नाहीये…तुम्ही असे नाही आहात. आम्हाला तुमच्या बाजूने बोलायचंय. मी त्यांना सांगितलं होतं अरे कशाला तुम्हाला तुमचं करिअर आहे.’ मग, त्या महिलांनी चॅनेल वाल्यांना बोलावून सांगितलं की, किरण माने असे नाहीत. हे आरोप चुकीचे आहेत. त्यांनी गैरवर्तन केलेलं नाही…उलट त्यांनी आम्हाला मदत केलीये.”
“पुढे जितेंद्र आव्हाड यांच्या घरी आमची एक बैठक झाली. तेव्हा चॅनल हेड सुद्धा आले होते. त्यांना पण या प्रकरणात खूप त्रास झाला होता. म्हणून त्यांना असं वाटलं की, मी त्यांचा नंबर सर्वांना दिला. पण, मी काहीच केलेलं नव्हतं. त्यानंतर दोन दिवसांनी हे प्रकरण मिटवूया असं ठरलं. अशाप्रकरणात अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत आणि माझ्याही मनात असे विचार आले होते. पण, मी मनाने खूप बळकट असल्याने ते प्रसंग मी टाळले. या प्रकरणात आणखी सुद्धा अनेक गुपितं आहेत पण, सध्या निवडणुकीच्या काळात मी काहीच नाही बोलणार…तेव्हा मला जो त्रास झाला त्याची भरपाई सहजासहजी होणार नाही. पण, मी ठरवलं होतं की, आपण स्वत: यातून बाहेर पडायचं. त्यानंतर मी आणखी एक मालिका केली, सिनेमे सुरू आहेत, आता आणखी एक मालिका करतोय…अनेक हिंदी वेबसीरिजसाठी विचारणा होतं आहे. पण, तो काळ प्रचंड वेदना देणारा होता.” असं किरण मानेंनी सांगितलं.