माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसला रामराम करून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. पक्षप्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी भाजपाने त्यांना राज्यसभा उमेदवारीची भेट दिली आहे. त्यानंतर चव्हाण यांची राज्यसभेवर बिनविरोध निवडही झाली आहे. अशोक चव्हाण यांना महाराष्ट्राच्याच राजकारणात काम करायचं होतं. परंतु, भाजपा नेतृत्वाने त्यांना दिल्लीची जबाबदारी दिली आहे. चव्हाणांकडे मोठा राजकीय अनुभव आहे. त्याचबरोबर त्यांची प्रशासनावर पकड आहे. असा नेता भाजपाला दिल्लीत हवा होता. त्यामुळेच चव्हाण यांना भाजपाने राज्यसभेवर पाठवलं आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये भाजपासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्ह्यात भाजपा मजबूत करण्यावर अशोक चव्हाणांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवलं असलं तरी सध्या त्यांच्यावर लोकसभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नांदेडसह आसपासच्या भागात भाजपाला मजबूत करण्यासाठी चव्हाण काम करू लागले आहेत. दरम्यान, भाजपा प्रवेशानंतर १० दिवसांच्या आत अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला पहिला दणका दिला आहे. चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी (२४ फेब्रुवारी) नांदेड-वाघाळा महानगरपालिकेतील ५५ हून अधिक माजी नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यापैकी बहुसंख्य माजी महापालिका सदस्य हे काँग्रेसमध्ये होते.

अशोक चव्हाण यांनी याबाबत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर माहिती दिली आहे. चव्हाण यांनी म्हटलं आहे की, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या मागील कार्यकाळातील नगरसेवकांशी विस्तृत चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सुमारे ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी आज विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्यासाठी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणाऱ्या सर्व माजी नगरसेवकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करतो.

हे ही वाचा >> “भाजपासाठी ३७० जागा जिंकणं अवघड, तर काँग्रेस…”, प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला लोकसभेच्या निकालाचा अंदाज

या पक्षप्रवेशानंतर अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेतील ५५ हून अधिक माजी नगरसेवकांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. हे सर्व लोक माझ्याबरोबर होते. आम्ही एकत्रितपणे या सर्वांना निवडून आणलं होतं. त्यांनी भाजपात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि आज त्यांचा पक्षात अधिकृत प्रवेश झाला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavan nanded waghala cmc congress ex corporators join bjp asc