scorecardresearch

‘बायो एनर्जी’ प्रकल्पाद्वारे उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न!

कळत नकळत आयुष्याची वाट चुकलेल्या वारांगना आणि समाजात होणारी सततची हेटाळणी सहन करीत लाचारीचे जीवन जगणाऱ्या तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यासाठी सन्मान आणि स्वाभिमानी जीवनाचा मार्ग सोलापुरात खुला होत आहे.

एजाजहुसेन मुजावर

सोलापूर : कळत नकळत आयुष्याची वाट चुकलेल्या वारांगना आणि समाजात होणारी सततची हेटाळणी सहन करीत लाचारीचे जीवन जगणाऱ्या तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यासाठी सन्मान आणि स्वाभिमानी जीवनाचा मार्ग सोलापुरात खुला होत आहे. सोलापूर महापालिकेच्या ‘बायो एनर्जी’ प्रकल्पाच्या माध्यमातून १२ वंचितांना हक्काचा रोजगार मिळाला असून दुसऱ्या टप्प्यात आणखी ३२ वंचितांना हा स्वाभिमानी रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यानंतर ३०० पेक्षा अधिक पीडित, वंचितांना या रोजगाराच्या माध्यमातून आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग मिळवून देण्याची तयारी महापालिका प्रशासनाने चालविली आहे.

वारांगना आणि तृतीयपंथीयांकडे माणूस म्हणून न पाहता त्यांच्याकडे सतत तिरस्काराने पाहिले जाते. देहविक्रय करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या वारांगना आणि रस्त्यावर भीक मागून किंवा अन्य वाममार्गाने पैसे कमावणारे तृतीयपंथीय आत्मसन्मान, स्वाभिमानापासून कोसो दूर आहेत. पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळताना या उपेक्षित वर्गासाठी काही तरी करण्याचे ठरविले. त्याची सुरुवात त्यांनी पोलीस खात्याच्या पेट्रोल पंपापासून केली. पोलीस पेट्रोल पंपावर दोन आणि साहाय्यक पोलीस आयुक्त (परिमंडळ-१) कार्यालयात एका तृतीयपंथीयाला नोकरी देण्यात आली. तिघेही सुशिक्षित असून त्यापैकी एकाचे उच्च माध्यमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे. दुसरा तृतीयपंथीय भाई छन्नुसिंग चंदेले समाजकार्य महाविद्यालयात एमएसडब्ल्यू पदव्युत्तर शिक्षण घेतो. त्यास पुढे स्पर्धा परीक्षाही द्यायची आहे.

वास्तविक पाहता पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या पगारापेक्षा भीक मागून येणारी कमाई दुप्पट आहे. परंतु त्यांनी त्या कमाईवर पाणी सोडले आहे. त्यापेक्षा आत्मसन्मानाने मिळणारा पगार त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा ठरला आहे. एवढय़ा तीन तृतीयपंथीयांपुरतेच काम थांबणार नव्हते. तत्पूर्वी, पोलीस आयुक्त बैजल यांनी रस्त्यावर भीक मागणाऱ्या महिलांसह वारांगना, अनाथ मुलींसाठी प्रार्थना फाऊंडेशनच्या साह्याने किमान कौशल्य प्रशिक्षण योजनेतून शिवणकाम प्रशिक्षण वर्ग सुरू केले होते.

अशा प्रकारे हे कार्य पुढे नेताना पोलीस आयुक्त बैजल यांनी अनाथ, निराधार, तृतीयपंथीय आणि वारांगनांसाठी काम करणाऱ्या आणखी स्वयंसेवी संस्थांशी संपर्क वाढविला. त्यातूनच पुढची वाट सापडली. सोलापूर महापालिकेचा तुळजापूर रस्त्यावर कचरा डेपो आहे. तेथेच खासगी तत्त्वावर कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती करणारा बायो एनर्जी सिस्टीम प्रकल्प सुमारे १८ वर्षांपासून कार्यरत आहे. या प्रकल्पात वारांगना आणि तृतीयपंथीयांना स्वाभिमानाने स्वत:च्या पायावर उभे करून कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्याचा विचार पुढे आला. पोलीस आयुक्त बैजल यांनी ही गोष्ट मनावर घेऊन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याशी चर्चा केली. शिवशंकर यांनीही संवेदनशीलता दाखवून बैजल यांच्या संकल्पनेला होकार दिला. त्यातूनच प्रथमच स्वाभिमान रोजगार प्रकल्प दृष्टीपथास आला. सोलापूर महानगरपालिका, पोलीस आयुक्तालय, सोलापूर बायो एनर्जी सिस्टीम आणि क्रांती महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने देशात प्रथमच अशा प्रकारच्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा अभिनव प्रकल्प सुरू असून त्यास मूर्तस्वरूप येऊ लागले आहे. या प्रकल्पाचा औपचारिक शुभारंभ पोलीस आयुक्त हरीश बैजल व पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते झाला.

सुमारे ४५ एकर परिसरातील कचरा डेपोमध्ये दररोज सरासरी २८० टन कचरा जमा होतो. तेथेच कचऱ्यावर प्रक्रिया करून बायो एनर्जी सिस्टिम प्रा. कंपनीच्या माध्यमातून दररोज चार मेगावॅट वीज तयार केली जाते. गेल्या दोन महिन्यांपासून तेथे वारांगना, तृतीयपंथीयांसाठी रोजगार प्राप्त झाला आहे. पहिल्या टप्प्यात १२ तृतीयपंथीयांची निवड करण्यात आली आहे. वारांगनांसाठी काम करणाऱ्या क्रांती महिला संघटनेने ५० वारांगना आणि तृतीयपंथीयांची यादी उपलब्ध करून दिली होती. त्यापैकी कामाची गरज आणि किमान कौशल्यावर आधारित १२ जणींना रोजगार देण्यात आला आहे. या सर्वाना कामाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. कचरा विलगीकरणाच्या कामासह अन्य कामे त्यांना मिळाली आहेत. लवकरच आणखी ३२ तृतीयपंथीयांनाही येथे रोजगार देण्यात येणार असल्याचे महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी सांगितले.

बायो एनर्जी कंपनीमार्फत किमान वेतन कायद्याप्रमाणे या प्रकल्पात रोजगार उपलब्ध झालेल्या वारांगना आणि तृतीयपंथीयांना दरमहा पगार देण्यात येत आहे. शहरात विविध ठिकाणी चार कचरा संकलन केंद्रे असून आणखी चार केंद्रांची भर पडणार आहे. या सर्व आठ कचरा संकलन केंद्रांवरही या पीडित आणि वंचित घटकांना रोजगार मिळवून दिला जाणार आहे. एवढेच नव्हे तर शहरात कचरा संकलनासाठी २२५ घंटागाडय़ा धावतात. घंटागाडी चालविण्याचे प्रशिक्षण देऊन गरजू वारांगना आणि तृतीयपंथीयांना वाहनचालक किंवा बिगारी म्हणून संबंधित खासगी एजन्सीकडून रोजगार मिळवून देण्याची तयारीही पालिका प्रशासनाने दाखविली आहे. सध्या शहरात चार ठिकाणी कचरा संकलन केंद्रे आहेत. आणखी चार केंद्रे होणार आहेत. तेथेही रोजगार उपलब्ध करून देता येईल, असे पांडे यांनी नमूद केले.

या माध्यमातून होणाऱ्या चांगल्या कामाच्या मार्गाचे महामार्गात रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही.

– हरीश बैजल, पोलीस आयुक्त, सोलापूर

वारांगना आणि तृतीयपंथीयांनाही आत्मसन्मानाने जीवन जगण्याचा, स्वत:ची प्रगती व उन्नती करण्याचा अधिकार आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.

– पी. शिवशंकर, आयुक्त, सोलापूर महापालिका

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Attempt bring underprivileged mainstream bio energy project self respecting of life way ysh

ताज्या बातम्या