पत्राचाळीतील १०३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सुरूवातीपासून सहभाग असल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) केला आहे. याप्रकरणी ईडीने नुकतेच आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रानुसार, २००६-०७ मध्ये पत्राचाळीच्या पुनविर्कासाबाबत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका झाल्या होत्या. त्यामध्ये संजय राऊत, म्हाडा अधिकारी व अन्य सहभागी झाले होते, असा उल्लेखही आरोपपत्रात आहे. त्यावरून आता भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं आहे. त्यामध्ये म्हटलं की, “पत्राचाळ प्रकरणाच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहता संजय राऊत यांना ते झेपवणारे नाही. बड्या सत्ताधारी राजकारण्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हा भ्रष्टाचार अशक्य होता. ईडीच्या आरोपपत्रात शरद पवार यांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी करावी,” अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.

हेही वाचा – “नारायण राणे खिलाडी वृत्तीने…”, अधीश बंगल्यातील बेकायदा बांधकामावरून पेडणेकरांचा खोचक टोला

ईडीने आरोपपत्रात काय म्हटलं आहे?

पत्राचाळ पुनर्विकासात संजय राऊत यांचा थेट सहभाग होता. अगदी सुरूवातीपासून ते प्रत्येक गोष्ट कृतीत आणण्यासाठी राऊत यांचा सहभाग आहे. २००६-०७ साली पत्राच्या चाळीच्या पुनर्विकासाबाबत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका झाल्या होत्या. त्यामध्ये संजय राऊत, म्हाडा अधिकारी व अन्य सहभागी झाले होते. त्यानंतर राकेश बाधवान सहभागी झाले. याप्रकरणात नियंत्रण राहण्यासाठी संजय राऊत यांनी प्रवीण राऊतांचा मोहरा म्हणून मेसर्स गुरू आशिश कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमीटेडचा संचालक केले, असे ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात सांगितलं आहे.