लेणी पाहायला जात आहात का? या पुढे ‘गाइड’ घेण्याची गरज नाही. जगप्रसिद्ध वेरुळ व अजिंठा लेणींची माहिती समजून घेण्यासाठी ‘ऑडिओ गाइड’ उपलब्ध होणार आहे. वेरुळ-अजिंठा सेंटरमध्ये लवकरच ही सुविधा कार्यान्वित होणार आहे.
ज्या क्रमांकाच्या लेणीसमोर आपण उभे राहू, त्याचा क्रमांक यंत्रावरील कळ दाबल्यानंतर त्याची माहिती पर्यटकांना कळू शकणार आहे. ही सुविधा मराठी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन व जपानी या भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. लेणी बनविली कशी? ती बनविताना वापरलेली हत्यारे कोणती? अशा प्रश्नांची उत्तरे व्हिजिटर सेंटरमध्ये मिळू शकतील. वेरुळ, अजिंठा येथील व्हिजिटर सेंटर पर्यटकांसाठी अजून खुले करण्यात आले नसले, तरी त्याची कामे प्रगतिपथावर आहेत. जपान बँकेच्या सहकार्याने वेरुळ-अजिंठा लेण्यांसाठी टप्पा दोनमध्ये विविध कामे हाती घेण्यात आली. अजिंठा येथील व्हिजिटर सेंटर तुलनेने मोठे आहे. ऑडिटोरियम, अॅम्फी थिएटर, लघुपट पाहण्यासाठीची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. वेरुळ येथील व्हिजिटर सेंटरमध्ये तर प्रतिकृतीही बनविल्या आहेत. त्याची माहिती देण्यासाठी ३३ ‘इअरफोन’ उपलब्ध आहेत. अजिंठा लेणीत ही संख्या ६६ आहे. अजिंठय़ातील व्हिजिटर सेंटरमध्ये २८० कार, २० बस, २०० दुचाकी वाहनांसाठी वाहनतळ उभारण्यात आले आहे. अजिंठा व्हिजिटर सेंटरमध्ये प्रतिकृतींचा प्रश्न निधीअभावी रखडला आहे.
७० कंपन्यांना निमंत्रण
अजिंठा व्हिजिटर सेंटरसाठी ५७ कोटी ५० लाख व वेरुळसाठी ३८ कोटी ६२ लाखांची तरतूद केली आहे. हे केंद्र उभारल्यानंतर ते चालविण्यासाठी ७० कंपन्यांना निमंत्रणे पाठविली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहुराष्ट्रीय कंपन्या हे व्हिजिटर सेंटर चालविण्यास उत्सुक आहेत.    (समाप्त)