औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. भाजपाकडून नामकरणाच्या मुद्द्यावर जोर दिला जात आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून नामांतराला विरोध होत आहे. त्यामुळे शहराच्या नामकरणावरून विरोधकांकडून शिवसेनेला लक्ष्य केलं जात असल्याचं चित्र आहेत. या राजकीय वादात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुणे जिल्ह्याचं नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी केली आहे. त्यामागील ऐतिहासिक घटनांचाही आंबेडकरांनी हवाला दिला आहे.

औरंगाबाद महापालिका निवडणुक तोंडावर आलेली असताना भाजपाने औरंगाबादच्या नामकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करणं हा अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असल्याचं सांगत नामकरणाची मागणी केली आहे. औरंगाबाद शहराला संभाजी महाराजांचं नाव देण्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मात्र, आक्षेप घेतला आहे.

एबीपी माझा वृत्त वाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद ऐवजी पुण्याला संभाजी महाराजांचं नाव द्यावं अशी मागणी केली आहे. “पाच वर्ष सरकारमध्ये असताना भाजपा-शिवसेनेनं औरंगाबाद शहराचं नाव का बदललं नाही, याचा खुलासा त्यांनी आधी करावा. औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे. मुघलाच्या काळात औरंगाबाद दुसरी राजधानी होती. औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे आणि ऐतिहासिक राहायला हवे. दुसरा भाग संभाजी महाराज यांच्यावर पुणे जिल्ह्यात अंत्यसंस्कार झालेले आहेत. पुणे जिल्ह्यातील वडूज गावात त्यांची समाधी आहे. त्यामुळे संभाजी महाराजांच स्मरण राहावं, असं वाटत असेल तर योग्य भूमी पुणे शहर आणि जिल्हा आहे. त्यामुळे पुण्याला संभाजी महाराजांचं नाव दिलं तर अधिक उचित होईल,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.