पटोलेंच्या नव्या चमूत अमर राजूरकर यांचा समावेश

नांदेड : काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातील पन्नासहून अधिक संघटनात्मक जिल्ह्यंमध्ये पक्षाचे सर्वाधिक बळ ज्या नांदेड जिल्ह्यत आहे, तेथून प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीत तिघांची वर्णी लागली आहे; पण जिल्ह्यत जे चार मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यात आहेत तेथून कोणालाही या कार्यकारिणीत स्थान मिळवता आलेले नाही.

काँग्रेसचे राज्य प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काही मंत्री तीन दिवसांपूर्वी काही कार्यक्रमांसाठी नांदेडमध्ये आले होते. मंत्री अशोक चव्हाण यांनी या जिल्ह्यत पक्षाचे बळ कायम राखल्याबद्दल त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षांव वरील कार्यक्रमांतून झाला. प्रदेशाध्यक्षांनी नांदेडचे शहराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर यांना पक्षसंघटनेत बढती देण्याचे संकेत येथेच दिले; त्यानुसार त्यांना प्रदेश उपाध्यक्ष करण्यात आले असले, तरी खुद्द अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघातील पूर्वीचे सरचिटणीस बी. आर. कदम यांना अर्धचंद्र देताना तेथून कोणालाही प्रदेश कार्यकारिणीत घेण्यात आलेले नाही.

नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखालील प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची ‘महाजम्बो’ यादी गुरुवारी रात्री राजधानी दिल्लीतून जाहीर झाली. त्यात मराठवाडय़ातील सर्व जिल्ह्यंना प्रतिनिधित्व आहे; पण नांदेड जिल्ह्यत मंत्री अशोक चव्हाण (भोकर), माधव जवळगावकर (हदगाव), मोहन हंबर्डे (नांदेड दक्षिण) या विद्यमान आमदारांच्या मतदार संघांतून एकाही कार्यकर्त्यांला पटोले यांनी आपल्या नव्या संघात घेतले नाही.

मागील अनेक वर्षे भाजपात राहून पुन्हा काँग्रेसमध्ये परतलेले अ‍ॅड. सुरेंद्र घोडजकर (नांदेड) आणि पक्षांतराची अशीच पार्श्वभूमी असलेले डॉ. श्रावण रॅपनवाड (मुखेड) यांना प्रदेश कार्यकारिणीत चिटणीस पदावर घेण्यात आल्याचे पाहून काही जाणते कार्यकर्ते चकित झाले. नांदेडचे माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत हे संयत आणि प्रभावी वक्ते आहेत; पण त्यांनाही प्रदेश कार्यकारिणीत सामावून घेण्यात आलेले नाही.

जिल्ह्यतील काँग्रेस पक्षांतर्गत राजकारणात मराठा समाज आणि या समाजाच्या कार्यकर्त्यांचा सतत प्रभाव राहिला. मुस्लीम समाजही या पक्षाचा मोठा आधार; पण या दोन्ही समाजातून कोणाचीही प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीत नियुक्ती झालेली नाही, त्याबद्दलची नाराजी दिसत असल्याचे जिल्हा काँग्रेसच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने शुक्रवारी मान्य केले. प्रदेश कार्यकारिणीत घेण्यात आलेले तीनही पदाधिकारी सूक्ष्म अल्पसंख्यांकांतील आहेत; पण जिल्ह्यतल्या मराठा समाजासह ओबीसी, लिंगायत, धनगर या प्रभावशाली समाजातील कोणालाही संधी मिळू नये, ही बाब अनाकलनीय असल्याचे वरील पदाधिकाऱ्याने नमूद केले.

रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे नजीकच्या काळात देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक होणार आहे. या भागातून कोणालाही प्रदेश कार्यकारिणीत घेण्यात आलेले नाही.

नागेलीकरांना जीवदान!

प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीत १८ उपाध्यक्षांसह तब्बल ६५ सरचिटणीस आणि १०४ चिटणिसांचा समावेश आहे. पक्षाने काही जिल्ह्यंत नव्या जिल्हाध्यक्षांचीही नियुक्ती केली; पण नांदेडचे जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर यांना अशोक चव्हाण यांच्या कृपेने तूर्त मुदतवाढ मिळाल्याचे दिसते.