ऊसदराच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर अटक करण्यात आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी तसेच सतीश काकडे यांचा जामीनअर्ज बारामतीच्या सत्र न्यायालयाने शुक्रवारी मंजूर केला. मात्र, आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांनी इंदापूर, बारामती व दौंड तालुक्यात न जाण्याची, त्याचप्रमाणे प्रक्षोभक भाषण न करण्याची अट न्यायालयाने घातली आहे. उसाला तीन हजार रुपये पहिला हप्ता द्यावा, या मागणीसाठी शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या दरम्यान त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना अटक झाल्यानंतर आंदोलनाने िहसक स्वरूप धारण केले. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर त्याचप्रमाणे पुणे जिल्हय़ातील इंदापूर, बारामती या भागात आंदोलनाचा भडका उडाला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सांगलीतील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे इंदापूरमध्ये ट्रकच्या टायरमधील हवा सोडत असताना टायर फुटून एका आंदोलकाचा मृत्यू झाला होता. एसटीच्या अनेक बसचेही या काळात नुकसान करण्यात आले.
आंदोलनाचा भडका उडाला असताना इंदापूर न्यायालयाने शेट्टी यांचा जामीन नामंजूर केला होता. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी बारामती न्यायालयात जामीनअर्ज दाखल केला होता.