संगमनेर: अध्यात्मासह निसर्गाशी जवळीक साधणारे उदाहरण म्हणून डॉ. संजय मालपाणी आहेत. उघड्या बोडख्या टेकड्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपारेश्वरच्या टेकड्यांवरील घनदाट वृक्षसंपदा निर्माण करण्यात मालपाणी परिवाराचा सिंहाचा वाटा असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.
गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. मालपाणी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालपाणी परिवाराने खांडगाव येथील कपारेश्वर टेकड्यांच्या परिसरात ५६ हजार झाडांच्या रोपण शुभारंभप्रसंगी थोरात बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार अमोल खताळ, आमदार सत्यजीत तांबे, प्राप्तीकर विभागाचे आयुक्त भारत आंधळे, सुवर्णा मालपाणी, मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी, मनीष मालपाणी, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, खांडगावचे सरपंच विकास गुंजाळ आदी उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले, संगमनेरच्या विकासात मालपाणी परिवाराचे मोठे योगदान आहे. मालपाणी परिवार सत्तेत नसताना समाजाभिमुख काम करीत आहे, याचा अभिमान वाटतो. आमदार तांबे म्हणाले, समाजातील गुणवंतांना त्यांनी उत्तेजन दिल्याचे दृश्यपरिणाम समोर येत आहेत. कपारेश्वराच्या टेकड्यांवरील हिरवे वैभव मालपाणी परिवाराची देण आहे. आयुक्त आंधळे, डॉ. मालपाणी यांचेही भाषण झाले. मनीष मालपाणी यांनी प्रास्ताविक केले. राजेश मालपाणी यांनी परिचय तर रमेश घोलप यांनी सूत्रसंचालन करत आभार मानले.
दीड लाखावर वृक्ष लागवड
मालपाणी परिवाराने यापूर्वी कपारेश्वर परिसरातील टेकड्यांसह कर्हेघाटातील खंडोबाचा डोंगर व धांदरफळ शिवारातील कारेश्वरच्या टेकड्यांवर दीड लाखाहून अधिक झाडे लावून त्याचे संगोपन केले आहे. त्यात आणखी ५६ हजार झाडांची भर पडल्याने काही वर्षांत या परिसराचे संपूर्ण रुपडे हिरवाईनं नटलेलं दिसेल.