राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत बरीच ओरड झाल्यानंतर त्यावर कितपत प्रभावी उपाययोजना झाली हा स्वतंत्र संशोधनाचा विषय असला, तरी केलेल्या कामाची प्रसिद्धी घेण्यात मागे न पडण्याची पुरेपूर तयारी सरकारने केली आहे. राज्यात साखळी पद्धतीने बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या सुमारे दीड हजार बंधाऱ्यांचा लोकार्पण कार्यक्रम १ जूनला एकाच दिवशी धूमधडाक्यात घेण्याचा निर्णय जलसंधारण विभागाने घेतला आहे. या कार्यक्रमात १५ लाख रुपयांचा चुराडा होणार आहे.
राज्यात जेथे भूगर्भातील पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा खोल गेली आहे, अशा सहा जिल्ह्य़ांतील १५ तालुक्यांमध्ये साखळी पद्धतीने सिमेंट काँक्रीटचा नाला बांध बांधण्याचा कार्यक्रम गेल्यावर्षी मे महिन्यात सुरू करण्यात आला. मार्च २०१३ अखेर राज्यात एकूण ४४४ गावांमध्ये असे १ हजार ४२२ बंधारे बांधून पूर्ण करण्यात आले आहेत. या पूर्ण झालेल्या सिमेंट बंधाऱ्यांचा लोकार्पण कार्यक्रम एकाच दिवशी, म्हणजे येत्या १ जून रोजी करण्याचे सरकारने ठरवले आहे.  या लोकार्पण कार्यक्रमामुळे दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्याच्या राज्य शासनाच्या उपक्रमाला योग्य प्रसिद्धी मिळावी, या उद्देशानेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या साखळी पद्धतीच्या सिमेंट नाला बांध कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होईल, त्याचप्रमाणे शेतीसाठी संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण होईल, असे जलसंधारण विभागाचे म्हणणे आहे.
कार्यक्रमाचा उद्देश चांगला असला, तरी त्याचे स्वरूप मात्र दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर एखादा महासमारंभ आयोजित केल्यासारखे होणार आहे. या सर्व १ हजार ४२२ बंधाऱ्यांच्या कामाचे स्थळ (अक्षांश-रेखांशासह), झालेला खर्च व पाणी साठवण क्षमता, तसेच तालुक्यातील काही निवडक बंधाऱ्यांच्या छायाचित्रांसह माहिती पुस्तिका छापण्यात येणार आहे. मुख्य लोकार्पण समारंभ सर्व १५ तालुक्यातील साखळी सिमेंट बांध स्थळानजिक आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याने असे एकूण १५ कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय मुख्य कार्यक्रमानंतर ‘मान्यवरांच्या हस्ते’ गावनिहाय साखळी पद्धतीने सिमेंट बांधांच्या प्रत्येक साखळीचे लोकार्पण त्या-त्या स्थळावर करण्यात यावे, अशा सूचना जलसंधारण विभागाने जीआर काढून दिल्या आहेत.
तालुकानिहाय होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत काढण्यात यावी व तीत आमंत्रितांचा राजशिष्टाचारानुसार उल्लेख करावा असे या सूचनांमध्ये नमूद केले आहे. राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाला वृत्तपत्रे व दूरचित्रवाहिन्यांवरून, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील व पंचात समिती कार्यालयांजवळ होर्डिग्ज लावून प्रसिद्धी द्यावी, अशा स्पष्ट सूचना संबंधित जीआर मध्ये देण्यात आल्या आहेत.
लोकार्पण कार्यक्रमातील प्रत्येक उपक्रमासाठी विशिष्ट अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे, यावरून सरकारने हा कार्यक्रम किती गांभीर्याने घेतला आहे हे लक्षात यावे. बंधाऱ्याचे स्थान दर्शवणारा फलक मुख्य रस्त्यावर लावण्यात यावा आणि त्यावर ‘शासनाचा दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम: साखळी पद्धतीने सिमेंट काँक्रीट बंधारे बांधणे’ या उल्लेखासोबतच त्या बंधाऱ्याचे छोटे छायाचित्र असावे, इतपत तपशील त्यावर नमूद करण्यासही सांगण्यात आले आहे. लोकार्पण कार्यक्रमासह इतर खर्चासाठी प्रत्येक तालुक्यामागे एक लाख रुपये, असा १५ लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. अशारितीने राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर  सरकारी खर्चाने जणू लग्नसराईच्या काळाला शोभावा, अशा एक ‘महासमारंभ’ होणार आहे.