महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमध्ये या दोघांची काय चर्चा झाली ते समोर येऊ शकलेलं नाही. मात्र विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शनिवारी संध्याकाळी ही भेट झाली. त्यानंतर आता कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या भेटीवर टीका केली आहे.

काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत. महाराष्ट्राचा मोठा अपराध तेव्हा राज्यपाल असलेल्या कोश्यारींनी केला आहे. हा अपराध किती मोठा आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. महाराष्ट्राच्या गुन्हेगाराला जर मुख्यमंत्री भेटत असतील तर ती त्यांची प्रवृत्ती आहे असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीवर भाष्य केलं आहे. महाराष्ट्र सगळं काही पाहतो आहे. घटनाबाह्य पद्धतीने काम करुन एक सरकार त्यांनी आणलं. त्यामुळे आपण बसवलेल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्याला माजी राज्यपाल भेटायला गेले असतील तर ते दोन घटनाबाह्य व्यक्ती बघून घेतील. आम्ही त्याकडे गांभीर्याने पाहात नाही. भगतसिंह कोश्यारींना त्यांच्या कृत्याची फळं लवकरच मिळतील आणि कायदेशीर मार्गाने मिळतील असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भगतसिंह कोश्यारींनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडली

भगतसिंह कोश्यारी यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडण्यासाठी घटनेचा गैरवापर केला हे महाराष्ट्राने पाहिलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन घालवण्यासाठी कोश्यारींनी कायद्याचा आणि घटनेचा गैरवापर केला हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. अशा माजी राज्यपालाला वर्षा बंगल्यावर बोलवून घटनाबाह्य मुख्यमंत्री मिठी मारत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.