भारत पेट्रोलियमच्या पानेवाडी इंधन प्रकल्पातील १७० टँकरचालक व वाहतूकदारांनी कोणतीही पूर्वसूचना न देता बुधवारी रात्रीपासून अचानक बेमुदत संप पुकारल्याने पुन्हा इंधन वितरण व्यवस्था ठप्प झाली आहे. या आंदोलनामुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडय़ातील १२ जिल्ह्यांमध्ये पुन्हा इंधनटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
याआधी ३० एप्रिलला टँकरचालकांनी संप केला होता. पण जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर २ मे रोजी तो मागे घेण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर ४ मे व त्यानंतर झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे वाहतूकदारांनी पुन्हा संपाचा मार्ग अवलंबिला आहे. इंडियन ऑइल व हिंदुस्तान पेट्रोलियमप्रमाणे १२ हजार लिटरच्या टँकरला प्रति किलोमीटर २५ रुपये २० पैसे हा वाहतूक दर मिळावा, ही चालकांची प्रमुख मागणी आहे. जोपर्यंत फेरनिविदा काढून नवीन दर वाढवून दिले जात नाहीत, तोपर्यंत अनिश्चित काळापर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धारचालकांनी केला आहे. आधी भारत पेट्रोलियम हिंदुस्तान पेट्रोलियमला पुरेसा इंधनपुरवठा करीत नसल्याने त्या कंपनीच्या बहुसंख्य पंपांवर इंधनाची यापूर्वीच टंचाई जाणवत आहे. आता भारत पेट्रोलियमचेही वाहतूकदार संपात उतरल्याने पुन्हा मोठय़ा प्रमाणात इंधनटंचाई भेडसावणार आहे. हिंदुस्तान पेट्रोलियमच्या २५० टँकर्सना सध्या भारत पेट्रोलियमकडून अपुरा इंधनपुरवठा होत आहे. वाहतूकदारांच्या भाव वाढवून देण्याच्या मागणीवर कंपनी व्यवस्थापन व जिल्हाधिकारी केवळ आश्वासने देऊन वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे आणि वाहतूकदारांची वारंवार फसवणूक करीत आहे, असा आरोप आंदोलक चालकांनी केला आहे. यामुळे बेमुदत संपावर उतरण्याचा निर्णय घेतल्याचे वाहतूकदार संघटनेचे नाना पाटील, संतोष गोडेस्वार, गफूरभाई शेख, दीपक आहेर आदींनी सांगितले.